Join us  

दादर ते पुणे... ई-शिवनेरी सुरू, असे आहे वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 12:25 PM

दररोज १५ फेऱ्या होणार असून लवकरच त्या दुप्पट करण्यात येणार आहेत.

मुंबई : एसटी महामंडळाने प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या ताफ्यात ई-शिवनेरीचा समावेश केला आहे. ठाणे ते पुणे मार्गावर नुकतीच इलेक्ट्रिक शिवनेरीची सेवा सुरू केली असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  आता महामंडळाने शुक्रवारपासून दादर ते पुणे मार्गावर इलेक्ट्रिक शिवनेरी बससेवा सुरू केली आहे. दादर ते पुणे इलेक्ट्रिक बस सेवा दर पंधरा मिनिटांनी चालविण्यात येणार असून तिचे तिकीट दर डिझेलवरील शिवनेरीपेक्षा कमी आहेत.  दररोज १५ फेऱ्या होणार असून लवकरच त्या दुप्पट करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी ठाणे– पुणेदरम्यान पहिल्या ई-शिवनेरीची सेवा सुरू करण्यात आली. या शिवनेरीला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने ई-शिवनेरीच्या ताफ्यात वाढ करण्यात येत आहे. डिझेलवरील शिवनेरीच्या जागी आता ई-शिवनेरी धावणार आहे.  सर्वसामान्य प्रवाशांसाठी तिकीट दर ५१५ रुपये  तर महिलांसाठी २७५ रुपये आकारण्यात येणार आहेत. 

असे आहे वेळापत्रक पहाटे ५.१५, पहाटे ५.३१, पहाटे ५.४५, सकाळी ६.१५, सकाळी ६.३१, दुपारी १२.१५, दुपारी १.१५, दुपारी १.३१, दुपारी १.४५, दुपारी २.३१, सायंकाळी ५.१५, सायंकाळी ५.३१, सायंकाळी ५.४५, सायंकाळी ६.१५, सायंकाळी ६.३१ अशा १५ फेऱ्या दादर – पुणेदरम्यान धावतील.

परळ येथे चार्जिंग पॉइंटई-शिवनेरीसाठी परळ येथे चार्जिंग यंत्रणेची उभारणी करण्यात येत होती. गेल्या काही दिवसांपूर्वी हे काम पूर्ण झाल्याने बसच्या चार्जिंगची समस्या सुटली. चार्जिंग केल्यानंतर ई-शिवनेरी ३०० किमी अंतर धावू शकते, अशी माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :बसचालक