दादरला चक्का जाम, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रार; व्यापाऱ्यांचे आयुक्तांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:47 IST2025-03-05T11:46:33+5:302025-03-05T11:47:26+5:30

वाहतूककोंडी आणि फूटपाथवरील अतिक्रमणामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार दादर व्यापारी संघाने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

dadar traffic jam complaint against unauthorized hawkers traders write to commissioner | दादरला चक्का जाम, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रार; व्यापाऱ्यांचे आयुक्तांना पत्र

दादरला चक्का जाम, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रार; व्यापाऱ्यांचे आयुक्तांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दादरच्या वीर कोतवाल उद्यानासमोरील आर. के. वैद्य रोड, एन.सी. केळकर मार्ग यासह परिसरात अनधिकृत पार्किंग आणि अनधिकृत फेरीवाल्यांमुळे चक्का जाम झाल्याची स्थिती झाली आहे. वाहतूककोंडी आणि फूटपाथवरील अतिक्रमणामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार दादर व्यापारी संघाने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

अतिक्रमणाचा केवळ पादचाऱ्यांनाच नव्हे, तर व्यावसायिकांनाही मोठा त्रास होत असून, ही परिस्थिती अधिक चिंताजनक झाली असल्याची तक्रार दादर व्यापारी संघाने केली आहे. पालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहून दादर मार्केट परीसरातील वाहतूककोंडी तातडीने सोडविण्याची मागणी केल्याचे व्यापारी संघाचे सचिव दीपक देवरूखकर यांनी सांगितले.

दादरमध्ये मुंबई, ठाणे जिल्हा, नवी मुंबईसह इतर भागांतून दररोज हजारो नागरिक खरेदीसाठी येतात. त्यातच अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाल्यांमुळे येथे पाय ठेवायलाही जागा नसते. दादरमधील प्रत्येक कोपऱ्यात आणि फूटपाथवर अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. पालिकेकडून कधीतरी होणाऱ्या कारवाई आधीच त्यांना टीप मिळते आणि कारवाईचा केवळ फार्स होतो, शिवाय दुकानांबाहेर सर्रास अनधिकृत पार्किंगला जागा मिळाल्याने, वाहतुकीचा वेग मंदावत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

फेरीवाला धोरणासाठी २०१४ मध्ये १,२८,४४४ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातून केवळ ३२ हजार फेरीवाले पात्र ठरले होते.

एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार

पार्किंगची समस्या मिटविण्यासाठी पालिकेकडून यापूर्वी पालिकेच्या जागेत व्हॅले पार्किंग योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, कालांतराने ती बंद पडली. पालिका, पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी समन्वयाने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी दादर व्यापारी संघाने केली आहे. पालिका अधिकारी, पोलिस अधिकारी आणि वाहतूक पोलिस एकमेकांकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकत असल्याचे दिसते, असे पत्रात म्हटले आहे.

व्यापारी संघाच्या मागण्या

व्हॅले पार्किंग पुन्हा सुरू करा. पोलिस, पालिका, वाहतूक पोलिस यांची संयुक्त बैठक घेऊन कारवाई करावी. अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करून त्यांची संख्या वाढण्यावर निर्बंध घालावेत.
 

Web Title: dadar traffic jam complaint against unauthorized hawkers traders write to commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.