दादर, वसई रोड पादचारी पूल १४ मेपासून बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 05:13 AM2019-05-12T05:13:31+5:302019-05-12T05:13:42+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर आणि वसई रोड स्थानकांतील पादचारी पूल १४ मेपासून बंद करण्यात येणार आहेत.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर आणि वसई रोड स्थानकांतील पादचारी पूल १४ मेपासून बंद करण्यात येणार
आहेत. दादर स्थानकातील चर्चगेट दिशेकडील पादचारी पूल सुरक्षेच्या कारणास्तव १४ मेपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी उर्वरित ४ पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसई रोड स्थानकावरील फलाट क्रमांक ६ आणि ७ वरील मध्यवर्ती पादचारी पुलाचा उत्तरेकडील जिना १४ मेपासून ते २९ मेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत जिन्याचीे दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या दरम्यान पर्यायी पुलाचा वापर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल दुर्घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुलाची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यास जलद गतीने सुरुवात केली आहे. यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण ४२ नवीन पादचारी पूल, पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी १०० कोटी ८७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.