लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचा विळखा असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत होतीच. बेस्ट उपक्रमालाही अखेरच्या बस थांब्यापर्यंत बस सेवा रद्द करावी लागली होती. याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर महापालिका आणि पोलिसांनी एकत्रित कारवाई करीत हा परिसर फेरीवालामुक्त केला आहे. या ठिकाणी पुन्हा बस सेवा सुरू करणे शक्य झाले आहे.
दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर फुलांची आणि भाज्यांची मोठी बाजारपेठ आहे. पहाटेपासूनच या ठिकाणी लोकांची मोठी वर्दळ असते. अनधिकृत फेरीवाल्यांनीही या भागात मोठ्या प्रमाणात आपले बस्तान बसवले आहे. रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यावरून चालणे पादचाऱ्यांना कठीण झाले आहे. एवढेच नव्हे तर या परिसरात बेस्ट उपक्रमामार्फत सुरू करण्यात आलेली बससेवाही खंडित करण्याची वेळ आली होती.
बेस्ट उपक्रमामार्फत दादरमध्ये वातानुकूलित मिनी बस मार्ग ए ११८ सुरू करण्यात आली आहे. या बसमार्फत दादर रेल्वे स्टेशनवरून प्रवाशांना आणण्यात व सोडण्यात येते. मात्र, दिवाळीच्या खरेदीनिमित्त या ठिकाणी फेरीवाल्यांची गर्दी असल्याने ही बससेवा कबुतरखाना इथपर्यंतच ठेवण्यात आली होती. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. याकडे बेस्ट उपक्रमाने पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार मंगळवारी या परिसरात कारवाई करीत फेरीवाल्यांना हटवण्यात आले.
पुन्हा परततील फेरीवाले...
दादर परिसराला अनेक वर्षांपासून फेरीवाल्यांचा विळखा आहे. पालिकेने कारवाई केल्यानंतर काही दिवस हे रस्ते मोकळे होतात. मात्र, पालिका आणि पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यावर पुन्हा येथे फेरीवाले व्यवसाय थाटतात. त्यामुळे आता तीच गत या रस्त्याची होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.