इको-फ्रेण्डली साहित्याला मागणी, सुट्टीच्या निमित्ताने दादरची बाजारपेठ हाउसफुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 03:10 AM2018-08-16T03:10:14+5:302018-08-16T03:10:52+5:30

महिन्याभरावर आलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी दादरच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. १५ आॅगस्टला आलेल्या सुट्टीचा फायदा घेत मुंबईकरांनी बुधवारी सकाळपासूनच दादर गाठले.

Dadar's market housefool : demand for eco-friendly literature | इको-फ्रेण्डली साहित्याला मागणी, सुट्टीच्या निमित्ताने दादरची बाजारपेठ हाउसफुल्ल

इको-फ्रेण्डली साहित्याला मागणी, सुट्टीच्या निमित्ताने दादरची बाजारपेठ हाउसफुल्ल

googlenewsNext

मुंबई - महिन्याभरावर आलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी दादरच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. १५ आॅगस्टला आलेल्या सुट्टीचा फायदा घेत मुंबईकरांनी बुधवारी सकाळपासूनच दादर गाठले. रानडे रस्ता, आयडियलची गल्ली, फूल मार्केट ही दादर बाजारपेठेतील महत्त्वाची ठिकाणे गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. प्लास्टीक बंदीमुळे पर्यावरणविषयक जागृती झाल्याने नागरिक इको-फ्रेण्डली साहित्य खरेदी करीत होते.
गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागताच दादरच्या बाजारपेठा महिनाभर आधीपासूनच सजू लागतात. यावर्षी थर्माकोलच्या बंदीमुळे सध्या दादरच्या बाजारपेठांत कापडी मखरांचे पर्याय उपलब्ध आहेत. हे मखर विकत घेण्यासाठी ग्राहकांची चांगली मागणी होती. सध्या दादरच्या बाजारात दीड फुटापासून ते सहा फुटांपर्यंतच्या कापडी मखरांचे पर्याय उपलब्ध आहेत. हे कापडी मखर कागदी पुठ्ठ्यांचे छोटे-छोटे रॉड करून तयार केले जातात. सध्या या कापडी मखरांची किंमत बाजारात दीड हजार रुपयांपासून ते ८ हजार ५०० रुपयांपर्यंत आहे. राज्य सरकारने प्लास्टीक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी घातल्याने या कापडी मखरांची मागणी वाढली आहे.
या वर्षी बाजारपेठांत विविध प्रकारचे कंठीहार, मोत्याचे-हिऱ्यांचे हार, मुकुट या प्रमुख आकर्षणाच्या गोष्टी आहेत. बालगणेश ते मोठ्या मूर्तीसाठी बाजारात आलेले फेटेही आकर्षण ठरत आहेत. आरतीसाठी आवश्यक असणाºया समई, धूप, अगरबत्ती, कापूस, तूप आदी वस्तूही विकत घेतल्या जात होत्या.

सजावटीच्या विविध वस्तू दाखल
बाप्पाच्या तयारीसाठी गणेशभक्तांची लगबगही साधारण महिनाभर आधीपासूनच सुरू होते. अनेक गणेशभक्त दादरच्या बाजारपेठेत खरेदी करून कोकणातील आपल्या गावची वाट धरतात. त्यामुळे १५ आॅगस्टच्या सुट्टीच्या दिवशीही बाजारात ग्राहकांची गर्दी होणार हे लक्षात ठेवून दुकानदारांनीही दुकाने सकाळी लवकर सुरू केली होती. तसेच मखर, कंठी, अगरबत्ती, समई, रोशणाईचे सामान, मुकुट, पूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी केली होती. अगदी १०-२० रुपयांपासून ते ३० हजार रुपयापर्यंतच्या सजावटीच्या वस्तू या वर्षी दादरच्या बाजारपेठांत आहेत. असे असले तरी प्लास्टीक, थर्माकोल यांच्याऐवजी कापडी, कागदी प्रकार घेण्याला ग्राहकांनी प्राधान्य दिल्याचे दिले.

मुंबापुरीत अवतरणार रावण अन् संकासूर


मुंबई : अवघ्या गणेशभक्तांना वेड लावणाºया गणेशोत्सवाची चाहूल मुंबापुरीला लागली आहे. मुंबईतील पारंपरिक आगमन सोहळ्यासाठी नावाजलेल्या काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ अर्थात, काळाचौकीचा महागणपतीच्या आगमनाने हा उत्साह द्वीगुणित होणार आहे. कारण रविवारी, १९ आॅगस्टला होणाºया आगमन सोहळ्यात गणेशभक्तांना रावण आणि संकासुरासह विविध आकर्षणे पाहता येणार आहेत.
या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष विजय लिपारे यांनी सांगितले की, मुंबईकर चातकाप्रमाणे गणेशोत्सवाची वाट पाहात असतात. त्यात काळाचौकीच्या महागणपतीने आपले पारंपरिक आगमन सोहळ्याचे वैशिष्ट्य जपले आहे. यंदाही वेगळेपण जपताना पारंपरिक आगमन सोहळा आयोजित केला आहे. त्यात रावण आणि संकासूर यांच्या पेहराव्यातील कलाकार आपली कला सादर करतील. याशिवाय कोकणात नाचविण्यात येणारी पालखी, बाल्या डान्स यांची धूमही सोहळ्यात दिसेल. शिस्तबद्धपणे चालणारे आदिवासी नृत्याची झलकही या सोहळ्यात पाहता येईल.
दरम्यान, डीजेला बगल देत गेल्या काही वर्षांपासून काळाचौकीचा महागणपती मंडळाकडून आगमन सोहळ्यात पारंपरिक वाद्यांची बरसात केली जाते. यंदाही ढोल पथकांसह लेझीम पथकांच्या तालावर तरुणाईला ठेका धरता येणार आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोहळ्यात पारंपरिक वस्त्रे परिधान करून सामील होणार असल्याची माहिती लिपारे यांनी दिली.आगमन सोहळ्यादरम्यान रस्त्यावर लाइव्ह रांगोळी काढली जाईल. याशिवाय शिवकालीन शस्त्रांचे खेळ हे डोळ्यांचे पारणे फेडतील. मराठमोळ्या संस्कृतीमधील धाडस आणि शौैर्याचे दर्शन यातून होईल, असा दावाही मंडळाने केला आहे.

आगमन सोहळ्यांचा श्रीगणेशा!

येत्या रविवारपासून बहुतेक गणेशोत्सव मंडळे ‘श्रीं’च्या मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात करतात. त्यामुळे रविवारपासून मुंबईतील परळ, चिंचपोकळी येथील कार्यशाळांमधून आगमन सोहळे पाहण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसतील. त्यामुळे गणेश चतुर्थीपर्यंत आगमन सोहळ्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Dadar's market housefool : demand for eco-friendly literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.