Join us

दादरच्या टिळक रोड उड्डाणपूलाचं काम वेगाने सुरू; स्पॅन गर्डरची उभारणी 

By सचिन लुंगसे | Published: March 29, 2024 6:49 PM

दोन टप्प्यात हा ब्रिज बांधला जाईल. पहिल्या टप्प्यात जुन्या ब्रिजला लागून असलेल्या नवीन ब्रिजचे बांधकाम सध्याच्या वाहतूकीला अडथळा येणार नाहीत, अशा पध्दतीने केले जात आहे

मुंबई : दादर येथील टिळक रोड ओव्हर ब्रिजचे काम वेगाने सुरु असून, नुकतेच या ब्रिजच्या स्पॅन गर्डरची उभारणी करण्यात आली आहे. येथील ५ पैकी २ गर्डर उभे करण्यात आले असून, उर्वरित कामेही वेगाने सुरु आहेत, अशी माहिती महारेलकडून देण्यात आली.पूर्व - पश्चिम दादरला जोडणा-या टिळक ब्रिजमुळे लोअर परळ, प्रभादेवी, वरळी ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंतच्या वाहतूकीला चांगली कनेक्टिव्हिटी मिळते आहे. आता महारेलने येथील जिओ टेक्निकल काम, जागेवरील युटीलिटीज स्थलांतरित करण्याचे काम पुर्ण केले आहे. ब्रिजचे काम जलदगतीने सुरु असुन, केबल स्टेड ब्रिजचे काम ६४० दिवसांत पुर्ण होईल. मध्य रेल्वे आणि महापालिका यांच्यातील समन्वयावर या कामाची गती अवलंबून आहे.दोन टप्प्यात हा ब्रिज बांधला जाईल. पहिल्या टप्प्यात जुन्या ब्रिजला लागून असलेल्या नवीन ब्रिजचे बांधकाम सध्याच्या वाहतूकीला अडथळा येणार नाहीत, अशा पध्दतीने केले जात आहे. त्यानंतर वाहतूक नव्या ब्रिजकडे वळवत जुना ब्रिज पाडला जाईल. दुस-या टप्प्यात केबल स्टेड ब्रिजच्या दुस-या बाजूची पुनर्बांधणी पुर्ण करण्यात येणार आहे. केबल स्टेड पुलाच्या प्रत्येक भागाची एकूण लांबी ६०० मीटर असुन प्रत्येक भागाची रुंदी १६.७ मीटर आहे. वाहतूकीसाठी ३ अधिक ३ लेन असतील. पूलाच्या बांधकाम खर्चाची एकूण किंमत ३७५ कोटी रुपये आहे.

- पहिल्या टप्प्यात एकूण ७ फाऊंडेशन बांधण्यात येतील.- ७ पैकी ५ फाऊंडेशनचे काम पुर्ण झाले आहे.- रेल्वे भागात पायलॉनसह उर्वरित २ फाऊंडेशनचे काम प्रगती पथावर आहे.- पिअर कॅपपर्यंत दोन्ही बाजूच्या अ‍ॅप्रोच स्पॅन्सचे काम पुर्ण झाले आहे.- अ‍ॅप्रोच स्पॅनसाठी सर्व स्टील गर्डर तयार असून, गर्डर टाकण्याचे काम सुरु आहे.