तेजस वाघमारे, मुंबईविद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने अंतिम अहवाल शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी झालेल्या चर्चेच्या तुलनेत समितीने घाईघाईत ४४ शिफारशींचा अहवाल सादर करून आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. परंतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे खरेच कमी होणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने नोव्हेंबर महिन्यात समिती नियुक्त केली होती. या समितीचा अहवाल एक महिन्याच्या आत येणे अपेक्षित होते. परंतु समितीला अहवाल सादर करण्यास खूपच विलंब झाला. मुंबई उच्च न्यायालयाने सरकारकडे अहवालाबाबत सतत विचारणा केल्याने समितीने घाईघाईने अहवाल सादर केला. मात्र या अहवालातील शिफारशी आणि जनतेच्या सूचनांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील वजन कमी होणार काय हा खरा प्रश्न आहे. समितीने अहवाल सादर केल्यानंतर तो शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले होते. परंतु अद्याप हा अहवाल शासन आणि शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेला नाही. याबाबत नागरिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे विचारपूस करत आहेत.
दप्तराचे ओझे खरेच कमी होणार ?
By admin | Published: May 02, 2015 5:16 AM