भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याचे रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर आज सांयकाळी angioplasty होणार आहे. गांगुलीनं नुकताच त्याच्या मुलीसोबत जाहीरात केल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या जाहीरातीची चर्चा असताना या बातमीनं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. सध्या, सौरव दादाची प्रकृती स्थिर असून दादा उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला आहे, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचं कारण नाही. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.
जय शहा यांनीही गांगुलीच्या कुटुंबीयांशी फोनद्वारे संवाद साधला असून दादाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. तसेच, मी दादाच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचेही जय शहा यांनी म्हटलंय.
गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. जीममध्ये कसरत करताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विटरवरुन सौरव गांगुलीच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थन केली आहे.
भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. आरे ला कारेनं उत्तर देण्याच्या त्याच्या शैलीनं टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला प्रतिस्पर्ध्यांना भिडण्याची ताकद दिली. २००३ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियानं १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नेटवेस्ट सीरिजमध्ये नमवल्यानंतर लॉर्ड गॅलरीत गांगुलीनं जर्सी काढून केलेलं सेलिब्रेशन आजही सर्वांच्या लक्षात आहे.
BCCIचा अध्यक्ष झाल्यानंतरही गांगुलीनं अनेक चांगले उपक्रम राबवले. त्याच्या नेतृत्वाखाली कोरोना संकटातही इंडियन प्रीमिअर लीग यूएईत यशस्वीरित्या पार पडली. गांगुलीनं ११३ कसोटीत ४२.१७च्या सरासरीनं ७२१२ धावा केल्या आहेत. त्यात १६ शतकं व ३५ अर्धशतकं आहेत. ३११ वन डे सामन्यांत ११३६३ धावा त्यांनी चोपल्या. त्यात २२ शतकं व ७२ अर्धशतकांचा समावेश आहे.
सूत्रांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार गांगुलीच्या छातीत कळा आल्या आणि त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. आज त्याच्यावर कदाचित अँजिओप्लास्टी केली जाईल. त्याची प्रकृती आता ठिक आहे. तो आऊट ऑफ डेंजर आहे.'' गांगुलीनं बुधवारी इडन गार्डनला भेट दिली आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठीच्या तयारीची माहिती घेतली.