दादासाहेब गवई हे राजकारणातील शालीन व ‘अजातशत्रू’ व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 06:12 AM2017-07-26T06:12:53+5:302017-07-26T06:12:56+5:30

dadasaheb gavai , nitin gadkari, news | दादासाहेब गवई हे राजकारणातील शालीन व ‘अजातशत्रू’ व्यक्तिमत्त्व

दादासाहेब गवई हे राजकारणातील शालीन व ‘अजातशत्रू’ व्यक्तिमत्त्व

Next

मुंबई : दादासाहेब म्हणजे अत्यंत नम्र, शालीन, सुसंस्कृत, परिपक्व आणि आंबेडकर चळवळीशी प्रामाणिक असे नेते होते. रिपब्लिकन चळवळीत त्यांनी अनेक नेते घडविले. सगळ्यांनी एकत्रित काम करावे, अशी त्यांची इच्छा होती. ते खºया अर्थाने अजातशत्रू होते, असे गौरवोद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे जीवनकार्य आणि त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाच्या योगदानावर आधारित ‘अजातशत्रू’ स्मृतीग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे, उपसभापती माणिकराव ठाकरे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ सचिव अनंत कळसे, रा.सू. गवई यांच्या पत्नी कमलताई गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, विधिमंडळ कामकाजाचे दादासाहेबांचे कौशल्य वादातीत होते. त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण होतीच पण त्यांचे कोणतेही वाक्य कामकाजातून काढून टाकण्याची वेळ कधी आली नाही.
गवई यांच्यासोबतच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांचा वारसा आम्ही असाच पुढे नेऊ, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले. जनतेप्रती दादासाहेब नेहमीच तत्पर असायचे, असे सांगत कमलताई गवई यांनी राज्य शासन आणि विधिमंडळाचे आभार मानले. यावेळी सभापती नाईक-निंबाळकर, विधानसभाध्यक्ष बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदींची भाषणे झाली.

अमरावती येथे स्मारक- मुख्यमंत्री
दादासाहेबांच्या पानाचा डबा जसा प्रसिद्ध होता तसाच लौकिक त्यांच्या जेवणाच्या डब्याचा होता. दादासाहेबांच्या व्यक्तिमत्वातून एका मनमोकळ्या वैदर्भीय माणसाची महाराष्ट्राला ओळख झाली. दादासाहेब सर्वांशी जिव्हाळ्याने बोलायचे. मी महापौर झालो तेव्हाचे दादासाहेब आठवतात. तसेच माझे वडील रुग्णालयात अत्यवस्थ होते. त्या कठीण प्रसंगी अगत्याने माझी चौकशी करून काही गरज भासली तर लगेच सांग या शब्दांत धीर देणारे दादासाहेब होते. नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे श्रेय गवई साहेबांचे आहे. दादासाहेबांच्या स्मरणार्थ अमरावती येथे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Web Title: dadasaheb gavai , nitin gadkari, news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.