दादासाहेब फाळके चित्रनगरीचा पुनर्विकास होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:07 AM2021-09-08T04:07:32+5:302021-09-08T04:07:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी येथे सध्या अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी येथे सध्या अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे लवकरच अत्याधुनिक आणि चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधांचा अभ्यास करून फिल्मसिटीचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
देशमुख यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी दादासाहेब फाळके चित्रनगरीसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सल्लागार अजय सक्सेना, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात आदींची उपस्थिती होती.
मनोरंजन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारले असून, फिल्मसिटीमध्ये दरदिवशी वेगवेगळ्या माध्यमांसाठी चित्रीकरण होत असते. या माध्यमांची आवश्यकता लक्षात घेऊन पुनर्विकास करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. भविष्यात सांस्कृतिक क्षेत्राचा विस्तार करीत असताना प्राधान्याने फिल्मसिटीचा पुनर्विकास करणे गरजेचे आहे. नव्याने करण्यात येणारा पुनर्विकास कसा असेल, त्याचे टप्पे कसे असतील, पुनर्विकास करीत असताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत, पुनर्विकासाचा टप्पा किती वर्षांचा असेल, अशा सर्व बाबींवर चर्चा यावेळी करण्यात आली.