पप्पा मला घेऊन जा... म्हणत विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:24 AM2020-12-15T04:24:47+5:302020-12-15T04:24:47+5:30

भांडुपमधील घटना : आत्महत्येच्या तीन तासांपूर्वी वडिलांना कॉल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लग्नानंतरच्या ८ महिन्यांतच नवविवाहितेने सासरच्या जाचाला ...

Daddy take me ... saying suicide of married woman | पप्पा मला घेऊन जा... म्हणत विवाहितेची आत्महत्या

पप्पा मला घेऊन जा... म्हणत विवाहितेची आत्महत्या

googlenewsNext

भांडुपमधील घटना : आत्महत्येच्या तीन तासांपूर्वी वडिलांना कॉल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लग्नानंतरच्या ८ महिन्यांतच नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत, आयुष्य संपविल्याची घटना भांडुपमध्ये घडली. आत्महत्येच्या तीन तासांपूर्वीच विवाहितेने वडिलांना फोन करून अत्याचार सहन होत नसून, सोबत घेऊन जाण्यास सांगितले होते. त्यानुसार, कुटुंबीय मुंबईला निघालेही. मात्र, अर्ध्या रस्त्यात असतानाच त्यांना मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळाली.

या प्रकरणी पती हितेंद्र गलांडे (३३), सासरा आनंद गलांडे (६०), सासू प्रभावती आणि नणंद प्रिया गलांडे व पूनम मटकरी यांच्याविरुद्ध भांडुप पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा नोंदवून पतीला अटक केली आहे. अटकेच्या वृत्ताला भांडुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक मयेकर यांनी दुजोरा दिला आहे.

मूळची अमळनेर तालुक्यातील असलेली उज्ज्वला सातपुते हिचे (२५) भांडुपच्या जंगल मंगल रोड परिसरात राहणाऱ्या हितेंद्रसोबत विवाह झाला. तिचे काका महेश सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या काही दिवसांतच पतीसह सासरच्या मंडळींनी पैशांसाठी तिचा छळ सुरू केला. गावातील असल्याने गावंढळ म्हणून हिणवणे सुरू झाले. वडील रिक्षाचालक असल्याने त्यांच्याकडून पैशांची मागणी पूर्ण होणे शक्य नव्हते. त्यानंतर, वाढत्या अत्याचाराला कंटाळून ती माहेरी निघून गेली. ६ महिने ती माहेरीच होती. नुकतेच ३० नोव्हेबरला सासरची मंडळी तिला घेऊन आले होते.

रविवारी दुपारच्या सुमारास उज्ज्वलाने वडिलांना फोन करून, सासरचा अत्याचार सहन होत नसल्याने सोबत घेऊन जाण्यास सांगितले. मुलीचे रडणे ऐकून वडिलांनी तत्काळ मुंबईकडे धाव घेतली. मात्र, अर्ध्यावर पोहोचताच तिने आत्महत्या केल्याचा फोन त्यांना आल्याने धक्का बसला. त्यांनी थेट पोलीस स्टेशनला धाव घेतली. तेथे सासरच्या मंडळीनी पोलिसांना दिलेल्या जबाबात माहेरच्या ओढीमुळे तिने आत्महत्या केल्याचे सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांनी सर्व घटनाक्रम सांगताच, पोलिसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

....................

तासाभरापूर्वी शेजाऱ्यांकडे कामासाठी विनंती

वडिलांच्या फोननंतर आत्महत्येच्या तासाभरापूर्वी तिने शेजाऱ्यांकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना नोकरी शोधा, मी घरात राहू शकत नाही, असेही सांगितल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.

Web Title: Daddy take me ... saying suicide of married woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.