तडीपारीची कारवाई न करण्यासाठी मागितली लाच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धारावी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीवर तडीपारीची कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करणारे दोन पोलीस अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबीने) जाळ्यात अडकले. पोलीस उपनिरीक्षक अमोल गाडे आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर जोशी अशी त्यांची नावे असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीत, तक्रारदाराला मारहाणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. अटकेदरम्यान त्याच्या अंगझडतीत ४० हजार रुपये जप्त करण्यात आले होते. सुटकेनंतर तक्रारदाराने जप्त केलेली रक्कम मागितली. त्या वेळी गाडेने त्याला केवळ १५ हजार रुपये दिले. पुढे तक्रारदारावर प्रतिबंधात्मक कारवाई होऊ नये म्हणून जोशीसमोर हजर केले. या प्रकरणी जोशीने बारा हजार रुपये मागितले. तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेताच एसीबीने शुक्रवारी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
.........................................................