Join us

'पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, आम्ही पुन्हा एकदा शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवू'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 7:57 PM

मी जे बोलतो ते उद्धव ठाकरे वेगळ्या भाषेत बोललेत. माझ्याच लोकांनी मला दगा दिला हे त्यांचं आजचं निवदेन आहे, ते डोळ्यात पाणी आणणारं आहे.

मुंबई - राज्याच्या कॅबिनेट बैठकीत गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुद्दा निकाली काढण्यात आला आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय बंडामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीला अत्यंत महत्त्व होते. विशेष म्हणजे औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, मुख्यमंत्री हे बहुमत चाचणीला सामोरे जातील, ते पळपुटे नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले. 

मी जे बोलतो ते उद्धव ठाकरे वेगळ्या भाषेत बोललेत. माझ्याच लोकांनी मला दगा दिला हे त्यांचं आजचं निवदेन आहे, ते डोळ्यात पाणी आणणारं आहे. ज्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंनी पुत्रवत माया केली, उद्धव ठाकरेंनी काहींना मुलासारखं सांभाळलं, काहींना मित्रासारखं सांभाळलं, काहींना भावासारखं सांभाळलं, त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठित खंजीर खुपसला. शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला, उद्धव ठाकरेंच्या भाषेत दगा दिला, असे म्हणत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर भाष्य केलं. तसेच, कॅबिनेट बैठकीनंतरही मुख्यमंत्री हे शेवटपर्यंत लढणार आहेत, असे म्हणत राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं.  

काय म्हणाले जयंत पाटील

राज्यातील राजकीय बंडानंतर आता 30 जुलै रोजी बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी ठाकरे सरकारच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणास मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती दिली. यावेळी, ही तुमच्या सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक होती का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी थांबा आणि पाहा... असे उत्तर दिले.  

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतराष्ट्रवादी काँग्रेस