डहाणू-बोर्डी सागरी मार्गाची दुरावस्था
By admin | Published: July 2, 2015 10:33 PM2015-07-02T22:33:47+5:302015-07-02T22:33:47+5:30
बोर्डी सागरी मार्गाची दुरावस्था झाली असून दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यात मातीचा भराव घालण्याचे काम सुरू आहे. परिणामी, डहाणू सार्वजनिक बांधकाम
बोर्डी : बोर्डी सागरी मार्गाची दुरावस्था झाली असून दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यात मातीचा भराव घालण्याचे काम सुरू आहे. परिणामी, डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरदहस्ताने कंत्राटदारांना सुगीचे तर प्रवाशांना खडतर दिवस आल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी या गावात डहाणू बोर्डी सागरी मार्गाची दुरावस्था झाली आहे. नरपड बस थांबा ते साईबाबा बस थांबा, कुंभारखाडी मोरी, मरवाड, टोकेपाडा तर घोलवड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, स्तंभ, ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस स्टेशन, बोर्डी ग्रामपंचायत, नेताजी रोड या महत्वाच्या रस्त्याची चाळण झाली आहे. डांबर व खडी निघाल्याने मार्गावर अर्धाफुट खोल खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर डबके तयार होत. प्रवासी वाहन, वाटसरु यांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने दररोज अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाहनांचा वेग मंदावणे, वाहतूक कोंडी यांमुळे भांडणाचे प्रसंग ओढवतात. ध्वनीप्रदूषण, इंधनाचा अपव्यय, वाहनांचे भाग खिळखिळे होणे, या समस्या वाढल्या आहेत. तर साचलेल्या पाण्यामुळे जलजन्य आजार, दुर्गंधी, पसरली आहे.
सजग नागरीक, समाजसेवक, विविध संस्था, आरोग्य व पोलीस विभाग, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यम यांनी वास्तव मांडल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेत नाही. दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये मातीचा भराव घालून तात्पुरती डागडुजी केली जाते.
दर्जेदार काम न करताही एकाच कंत्राटदाराला दरवेळी ठेका कसा मिळतो याबाबत नागरीकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (वार्ताहर)