डहाणूची काँग्रेस फुटली
By admin | Published: January 11, 2015 11:38 PM2015-01-11T23:38:05+5:302015-01-11T23:38:05+5:30
पालघर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आज उफाळून येऊन तालुका काँग्रेस अध्यक्षासह शेकडो पदाधिका-यांनी राजीनामे दिले
डहाणू : पालघर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आज उफाळून येऊन तालुका काँग्रेस अध्यक्षासह शेकडो पदाधिका-यांनी राजीनामे दिले असून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. ऐन जिल्हापरिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरु असताना डहाणू तालुका काँग्रेस अध्यक्ष व डहाणू रोड जनता बँकेचे अध्यक्ष भरत राजपूत यांनी पक्षांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीमुळे अखेर राजीनामा दिल्याने काँग्रेसला खिंडार पडले आहे.
पालघर जिल्ह्यातील काँग्रेस आय पक्षात गेल्या विधानसभा निवडणुकीपासून माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित आणि तालुका अध्यक्ष भरत राजपूत यांच्यात अंतर्गत वाद सुरु होते. पालघर विधानसभेचे तिकीट मिळविल्यापासून राजेंद्र गावित यांनी पालघरमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विरोधात स्वतंत्र गट तयार केला. विरोधकांना सन्मानाने वागणूक देऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली असे आरोप भरत राजपूत यांनी केले आहेत. तर भरत राजपूत मागील निवडणूकीपासून काँग्रेसच्या विरोधात काम करीत असल्याचे आरोप राज्यमंत्री गावीत करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप होत होते. दोन दिवसांपूर्वी पालघर येथे झालेल्या विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सभेत भरत राजपूत व त्यांच्या समर्थकांना अपमानास्पद वागणूक दिल्याने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत व पदाधिकाऱ्यांत चलबिचल सुरु होती. (वार्ताहर)