डहाणू : नगराध्यक्ष मिहिर शाह यांच्या प्रयत्नाने डहाणूतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून डहाणू नगरपरिषदेने शासनाला सादर केलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी तीस कोटी रू. मंजूर झाले आहेत. नगरपरिषद हद्दीत जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आता डहाणूकरांना चोवीस तास पाणी मिळणार असल्याचा दावा नगराध्यक्ष शाह यांनी केला आहे.डहाणू नगरपरिषद हद्दीत एकूण तेवीस प्रभाग असून येथे गेल्या अनेक वर्षापासून नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत पिण्याचे पाणी पुरविले जाते. डहाणू शहरात एकुण ४८५० नळ कनेक्शन धारक असून त्यांना दररोज साखरा धरणातून पाणीपुरवठा केले जाते. परंतु धरणापासून डहाणूपर्यंत असलेली १६ कि. मी. ची जलवाहिनी जीर्ण व जुनाट झाल्याने त्याच्यातून मोठ्या प्रमाणात गळती होऊन तसेच अनेक ठिकाणी पाण्याची जलवाहिनी फोडून पाणी चोरण्याचे प्रकार होत असल्याने दररोज सुमारे तीस लाख लिटर पाणी वाया जात होते. त्यामुळे डहाणूगाव, सतीपाडा, लोणीपाडा, पारनाका इ. भागातील ग्रामस्थांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. शिवाय डहाणू पालिकेचे दरवर्षी लाखोंचे नुकसान होत आहे. या योजनेअंतर्गत डहाणू नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागात पाण्याच्या नवीन सहा टाक्या बांधण्याचे काम सुरू झाले आहे. जलशुद्धीकरणासाठी एक मोठा जलकुंभ तयार होणार आहे. येत्या सहा महिन्यात ही सर्व कामे पूर्ण होऊन डहाणूकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार असल्याचे सांगितले जाते.दरम्यान डहाणूच्या बंदरपट्टी भागातील २९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बाडापोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने हिरवा कंदील दाखवून ४३ कोटी ३८ लाखाचे अनुदान मंजूर केले होते. त्या कामालाही सुरूवात झाली आहे. पश्चिम भागातील गावात रोज शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार आहे.
डहाणूला मिळणार २४ तास पाणी
By admin | Published: November 21, 2014 12:02 AM