Join us

शिक्षक बडतर्फीसाठी डहाणूत ठिय्या आंदोलन

By admin | Published: April 06, 2015 10:54 PM

डहाणूतील राई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जिल्हापरिषदेच्या शाळेतील संतोष साबळे या शिक्षकाने सात ते आठ वर्षीय बालिकांवर अत्याचार केल्याप्रकरणी

डहाणू : डहाणूतील राई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जिल्हापरिषदेच्या शाळेतील संतोष साबळे या शिक्षकाने सात ते आठ वर्षीय बालिकांवर अत्याचार केल्याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीची तीन दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली होती. परंतु विकृत शिक्षक साबळे यांना त्वरीत बडतर्फ करून त्याच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी डहाणूच्या पंचायत समितीवर आदिवासी एकता परिषदेतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले.डहाणूतील जिल्हापरिषद शाळेतील शिक्षक संतोष साबळे यांनी आपल्याच शाळेत शिकत असलेल्या चार, पाच मुलींबरोबर अश्लील चाळे केल्याचे आरोप पीडित मुलींच्या आई वडीलांनी केले आहेत. हा प्रकार मागील शुक्रवारी (२७ मार्च) उघडकीस आला होता. त्यानंतर मुलींनी शाळेत जाणे बंद केले होते. याबाबत जिल्हापरिषद शाळेतील पीडित तीन मुली, पालक तसेच ग्रामस्थांनी डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलीसांनी विकृत शिक्षक संतोष साबळे यांच्यावर बालकांचे लैंगीक शोषण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.या घटनेचा आदिवासी एकता परिषदेने तीव्र निषेध केला असून जिल्हापरिषदेचा शिक्षण विभागाने शिक्षक साबळे यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी डहाणू पंचायत समितीवर शेकडो स्त्री, पुरूषांनी एकता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता करबट यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. या वेळी गटविकास अधिकारी रमेश आवचार, सभापती चंद्रिका आंबात तसेच उपसभापती लतेस राऊत यांनी शिक्षकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)