लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दहीहंडीच्या नावाने गोविंदा समन्वय समितीने चालविलेल्या मनमानी कारभाराने ऐन रंगात आलेल्या सराव काळात जन्माष्टमीपूर्वीच गोविंदा पथकाच्या या समितीमध्ये भांडणे होऊन साऱ्या उत्सवाचाच दहीकाला झाला आहे. समन्वय समिती फुटली असून नवीन असोसिएशनची स्थापना करण्यात आल्यामुळे गोकुळाष्टमी पूर्वीच समन्वय समिती व असोसिएशनची हंडी फोडण्यापेक्षा गोविंदांची परस्परांची पथके फोडण्यात जोरदार चढाओढ सुरू झाली आहे.
नवीन दहीहंडी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण पाटील आणि सदस्य कमलेश भोईर यांनी शनिवारी पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला. मुंबईसह राज्यभरातील गोविंदा पथकांचे प्रश्न सोडविले जावे आणि गोविंदाला खेळाचा दर्जा, नोकरीत आरक्षण मिळावे, अशा प्रमुख मागण्यासाठी गोविंदा समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. मात्र, समितीच्या मनमानी कारभारामुळे आम्ही नवीन दहीहंडी असोसिएशनचे स्थापन करीत असल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे एकूणच गोविंदा पथकांच्या प्रश्नाऐवजी राजकारणाचेच थरावर थर येथे रचले जाऊ लागले आहेत, अशी जाणकारांमध्ये चर्चा आहे.
२१० पथकांचा समावेश
- या दहीहंडी असोसिएशनमध्ये नऊ जिल्ह्यातील २१० पथकाचा समावेश आहे. मुंबईतील माझगाव ताडवाडी, जय जवान, उमरखाडी गोविंदा पथक डोंगरी, जरीमरी गोविंदा पथक गिरगाव, जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक अशा मोठ्या पथकांचा समावेश आहे.
- दहीहंडी साहसी खेळ हा शून्य अपघात असला पाहिजे, त्यासाठी विभागवार असोसिएशनचे पदाधिकारी छोट्या मोठ्या पथकांना प्रशिक्षक देणार आहेत.
- जिल्ह्यामध्ये शासनाच्यावतीने स्पर्धा आयोजित करण्यासाठी दहीहंडी असोसिएशन समन्वय साधून स्पर्धा घेण्याचा दहीहंडी असोसिएशनचा मानस आहे, अशी अनेक उद्दिष्टे असल्याचे यंग उमरखाडी गोविंदा पथकाचे आणि असोसिएशनचे सरचिटणीस कमलेश भोईर यांनी सांगितले.