लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोविंदा पथकांना सरावासह मंगळवारी दहीकाल्याच्या दिवशी क्रेन, दोरी, सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवावेत, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका एवढा खर्च करत असते, तर दहीहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत आहे, अशी भूमिका केसरकर यांनी घेतली आहे. गोविंदा, दहीहंडी आणि उंच मानवी थर, ही मुंबईची संस्कृती आणि ओळख आहे. ही ओळख टिकावी म्हणून प्रो-गोविंदासाठी जिल्हा विकास नियोजन विभागातून दोन कोटींचा निधी देण्यात आला. करणाऱ्या गोविंदा पथकांना मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी क्रेन, दोरी, सेफ्टी बेल्ट पुरवावे, असे आदेश केसरकर यांनी दिले आहेत. मंगळवारी गोपाळकालाच्या दिवशी देखील ही सेवा पुरवावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
सर्वात वरच्या दोन-तीन थरांवर असलेल्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी या उपाययोजना कराव्यात. दुर्घटना घडून कोणती जीवितहानी होऊ नये, याकरिता सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून हा खर्च करावा, असेही केसरकर यांनी आदेशात म्हटले आहे. हे पहिलेच वर्ष असून किती आणि कशाप्रकारे क्रेन पुरवता येतील त्याचा विचार करावा व पुढील वर्षी जास्तीतजास्त मंडळांना क्रेन परवाव्यात. असेही त्यांनी पालिका प्रशासनाला सांगितले.
स्वतःची काळजी आवश्यक-
१) दहीहंडीच्या वेळी मानवी थर रचताना अनेक अपघात होतात. प्रत्येक वर्षी, असंख्य गोविंदा आणि सहभागींना फ्रैक्चर आणि मेंदूच्या दुखापतींचा सामना करावा लागतो. २०२३ मध्ये, मुंबईत दहीहंडी उत्सवात २०० हून अधिक जखमी आणि तिघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
२) स्पर्धेच्या चढाओढीत सततच्या दबावामुळे सहभागी गोविंदांना अनावश्यक धोका पत्करावा लागतो. अशावेळी डोक्याच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, गुडघे तसेच कोपरावर पॅड, मनगटावर संरक्षणात्मक बँड वापरणे त्याचबरोबर स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे आवश्यक आहे.