- संतोष आंधळेमुंबई - दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मुंबईत ३५ गोविंदा जखमी झाले असून त्यापैकी चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. उपचारासाठी ज्या गोविंदाना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यामध्ये प्रत्येकी २ गोविंदा के इ एम रुग्णालयात आणि राजवाडी रुग्णलयात उपचार घेत आहे. नऊ गोविंदाना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर २२ गोविंदावर सध्या ओ पी डी मध्ये सध्या उपचार सुरु आहेत.
दरवर्षी कमी जास्त संख्येत गोविंदा जखमी होत असतात. काही गोविंदांना मुका मार लागतो तर काही गोविंदांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागते. या वर्षी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील सर्व रुग्णलयातील १२५ पेक्षा अधिक रुग्णवाहिका आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.याकरिता महापालिकेने ३ पाळ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांची यांची नियुक्ती केली आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार दुपारी तीन पर्यंत , के इ एम रुग्णालयात १६, सायन रुग्णलयात ७ , नायर रुग्णालयात २, जे जे रुग्णालयात १ , जी टी रुग्णलायत १, राजवाडी रुग्णालयात - ३, व्ही एन देसाई रुग्णालयात - २ ,कूपर रुग्णालयात - २, पोद्दार रुग्णालयात - १, या गोविंदांना उपचारासाठी रुग्णलायत आणण्यात आले होते. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.