Join us

गोविंदा कोरडाच; पावसाच्या केवळ हलक्या सरी बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 8:33 AM

हंड्या फोडत मुंबापुरी घुमणारा गोविंदा मुसळधार पावसाभावी कोरडाच राहणार आहे.

ठळक मुद्देहंड्या फोडत मुंबापुरी घुमणारा गोविंदा मुसळधार पावसाभावी कोरडाच राहणार आहे.मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. ‘मोनोच्या खांबांना हंडी बांधू नका’

मुंबईमुंबई शहर आणि उपनगराला लागलेले दहीहंडीचे वेध आज संपणार असून, ठिकठिकाणी बांधण्यात येत असलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा रस्त्यावर उतरणार आहेत. गोविंदाच्या जोडीला वाद्यवृंद, नाशिक ढोल आदी पथकेही सज्ज असून, सकाळपासून सुरू होणारा हा उत्सव रात्री उशिरापर्यंत उत्तरोत्तर रंगणार आहे. मात्र, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, शनिवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. परिणामी, हंड्या फोडत मुंबापुरी घुमणारा गोविंदा मुसळधार पावसाभावी कोरडाच राहणार आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी, कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, येत्या २४ तासांत पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण पूर्व राजस्थान, ओरिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये हवामान कोरडे राहील.

 

राज्यासाठी अंदाज

२४ ऑगस्ट : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

२५ ऑगस्ट : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

२६ आणि २७ ऑगस्ट : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

पाऊसगाथा...

- गेल्या २४ तासांत मुंबईमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. कुलाबामध्ये ६ मिमी, तर सांताक्रुझमध्ये फक्त ०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

- मुंबईत जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला.

- जुलै महिन्यात इतका मुसळधार पाऊस पडला की, अवघ्या काही मिमी पावसाच्या अभावामुळे यापूर्वीचा पावसाचा विक्रम मोडायचा राहिला.

- ऑगस्टची सुरुवातही दमदार पावसाने झाली असून, पहिल्या पाच दिवसांत तीन अंकी पाऊस नोंदवला गेला.

- मुंबईमध्ये ६ ऑगस्टपासून दोन अंकी पावसाचीसुद्धा नोंद झाली नाही, तर काही दिवस पूर्णपणे कोरडेच राहिले.

- ऑगस्ट महिन्यात मुंबईत सामान्य ५८५ मिमी पावसाच्या तुलनेत ३२१ मिमी पावसाची नोंद झाली.

- महिना संपण्यास आता फक्त एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस हे लक्ष्य गाठेल, अशी आशा नाही.

- पुढील ४८ तासांतही मुंबईमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. महिना अखेरीस काही मध्यम सरींची शक्यता असली, तरी तूट भरून काढण्यासाठी हे पुरेसे ठरणार नाही.

‘मोनोच्या खांबांना हंडी बांधू नका’

- मोनोरेल गाइड वे बीम्सच्या दोन्ही बाजूकडून अधिकतम भारासह ७५० व्होल्ट डी.सी. इतक्या ट्रॅक्शन पॉवर रेल्स आहेत. गाइड वे बीम्सवरील या रेल्सच्या जवळपास लोखंडी वस्तू येणे प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे मोनोच्या खांबांना हंडी बांधू नका, असे सांगत एमएमआरडीए प्रशासनाने मोनोरेल्वे मार्गाच्या सुरक्षा क्षेत्राबाबत काही सूचना केल्या असून त्यांचे पालन करावे, असे आवाहनही केले आहे.

- या सूचनांनुसार, मोनोरेल्वे मार्गाच्या सुरक्षा क्षेत्रात ५.५ मीटरपेक्षा जास्त उंचीची वाहने आणू नयेत. क्रेनच्या बूमसह क्रेनची हालचाल करू नये. पोस्टर्स फलक लावू नयेत. मोनोरेल्वे गाइड वे किंवा बांधकामावरून केबल्स वायर्स ओलांडून नेऊ नये. कुठल्याही प्रकाराचे पुतळे अथवा प्रदर्शनाची ने-आण करू नये. गाइड वे बीमच्या आसपास दहीहंडी उभारून मोनोरेल्वेच्या सुरक्षेला धोका पोहोचवू नये, असे स्पष्ट केले आहे. याचे पालन न केल्यास दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली.

 

टॅग्स :दहीहंडीमुंबईमेट्रोपाऊस