मुंबईत दहीहंडीच्या सणाला गालबोट; दुपारपर्यंत ४१ गोविंदांना दुखापत, उपचार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 05:36 PM2024-08-27T17:36:47+5:302024-08-27T17:56:45+5:30
मुंबईत साजरा करण्यात येत असलेल्या दडीहंडीच्या उत्सवाला गोविंदा जखमी झाल्याने गालबोट लागलं आहे.
Mumbai Dahihandi 2024 : देशासह राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र अशातच या उत्साहाला गालबोट लागलं आहे. मुंबईत दुपारपर्यंत ४१ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी गोविंदावर मुंबईच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. काही गोविंदांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं असलं तर अनेकांवर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.
मुंबईमध्ये दहीहंडीच्या उत्सवादरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंतच्या आकेडवारीनुसार ४१ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी, महानगरपालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात जखमी गोविंदांवर उपचार सुरु आहेत. सेंट जॉर्ज, पोतदार हॉस्पिटल, केईएम, राजावाडी, एमटी अग्रवाल, कुर्ला भाभा, शताब्दी या रुग्णालयांमध्ये जखमी गोविंदावर उपचार सुरु आहेत. सर्वाधिक जखमी गोविंदा पोतदार रुग्णालय, केईएम आणि नायर रुग्णालयामध्ये आहेत.
दरम्यान, या सर्व जखमी गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू असून सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सध्या या सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
जखमी गोविंदांची आकडेवारी
सेंट जॉर्ज हॉस्पिटल २ जखमी गोविंदांची नोंद. एक रुग्णालयात दाखल, एकावर उपचार सुरु
जीटी हॉस्पिटल एक गोविंदा जखमी
पोद्दार हॉस्पिटलमध्ये ६ गोविंदा जखमी. उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला.
केईएम हॉस्पिटलमध्ये ८ जखमी गोविंदा उपचारासाठी दाखल, ७ रुग्णांना उपचार करुन घरी सोडलं.
नायर हॉस्पिटलमध्ये ५ जखमी गोविंदावर उपचार सुरु
सायन हॉस्पिटलमध्ये ३ जखमी गोविंदावर उपचार सुरु
राजावाडी हॉस्पिटलमध्ये तीन जखमी गोविंदा दाखल
एमटी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये १ जखमी जखमी गोविंदा दाखल
कुर्ला भाभा हॉस्पिटलमध्ये दोन जखमी गोविंदा दाखल
शताब्दी गोविंद हॉस्पिटलमध्ये दोन गोविंदा जखमी, उपचार सुरु
वांद्रे भाभा हॉस्पिटलमध्ये ३ जखमी गोविंदांवर उपचार सुरु