Dahi handi: ‘प्रो गोविंदा’ हे तर दहीहंडीचे बाजारीकरण?
By संदीप प्रधान | Published: September 11, 2023 01:15 PM2023-09-11T13:15:01+5:302023-09-11T13:15:37+5:30
Dahi handi: कबड्डी आणि दहीहंडी हे मुख्यत्वे रांगडे, गोरगरीब कामगार वर्गाचे खेळ. बिनपैशांची करमणूक व व्यायाम. या दोन्ही खेळांना बाजारमूल्य प्राप्त होणार आहे.
- संदीप प्रधान
(वरिष्ठ सहायक संपादक)
कबड्डी आणि दहीहंडी हे मुख्यत्वे रांगडे, गोरगरीब कामगार वर्गाचे खेळ. बिनपैशांची करमणूक व व्यायाम. या दोन्ही खेळांना बाजारमूल्य प्राप्त होणार आहे. प्रो कबड्डी सुरू झाल्यावर आता त्याचे सामने हे वरळीच्या जांभोरी मैदानात न होता वरळीच्या एनएससी डोममध्ये होतात. मॅटवर सामने होत असल्याने माती अंगाला लागत नाही.
दहीहंडीचे रूपांतर प्रो गोविंदात झाले आहे. यंदा प्रो गोविंदाचे सामने झाले. प्रो कबड्डीचे सामने सुरू झाल्यापासून कबड्डीच्या छोट्या-मोठ्या सामन्यांचे बातमीमूल्य संपुष्टात आले. प्रो गोविंदामुळे दहीहंडीचे बाजारीकरण झाले तर कृष्णजन्माष्टमीच्या उत्सवाचे सध्याचे महत्त्व संपुष्टात तर येणार नाही ना, अशी भीती वाटत आहे.
दहीहंडी ही मुळात गिरगावातील चाळी, वाडे, सोसायट्या यांच्यापुरत्या मर्यादित होत्या. दादर भागात दहीहंडी लागायच्या व चार ते पाच थर लावून एकेकाळी त्या फोडल्या जायच्या. परळ, लालबाग, वरळीच्या गिरणी कामगारांची मुले मुख्यत्वे हा खेळ खेळायची. गेल्या दीड ते दोन दशकात राजकीय नेत्यांना या खेळात पाॅलिटिकल पोटेन्शियलचा शोध लागला. मतांची हंडी भरण्याकरिता दहीहंडीला पैशांची हंडी रिती होऊ लागली. लाखो रुपयांची बक्षिसे, सेलिब्रिटी, डीजे अशी पैशांची खैरात सुरू झाली. वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांमध्ये ईर्षा सुरू झाली. पक्षांचे प्रमुख राजकीय नेते खड्ड्यांतून वाट काढत कुलाब्याच्या दांडीपासून भिवंडीपर्यंत फिरून दहीहंडी उत्सवात चमकू लागले. दहीहंडीच्या खेळाचे राजकीयीकरण झाले. खेळ निदान एकाच दिवशी व रस्त्यावरच खेळला जात होता.खिडक्या, गॅलऱ्यांत उभे राहून हजारो लोक खेळ पाहत आहेत. मात्र, आता राजकीय नेत्यांना दहीहंडीचे संपूर्णपणे बाजारीकरण करायचे आहे.
राजकीय नेत्यांच्या टीम
प्रो गोविंदाचे सामने कधीही बंदिस्त स्टेडिअममध्ये होऊ शकतात. अर्थात तेथे पाऊस असणार नाही. डीजे नसेल. चीअर गर्ल्स असू शकतात. विशिष्ट वेळेच्या मर्यादेत मानवी मनोरे झटपट कोण रचतो, याची स्पर्धा होईल. आता सर्वसामान्य दहीहंडीप्रेमी येथे तिकीट काढून दर्शक म्हणून जाईल की नाही? त्याला रस्त्यावरच्या दहीहंडीतील नैसर्गिक साहस प्रो गोविंदात सापडेल की नाही, असे अनेक प्रश्न प्रो गोविंदाचा स्वीकार कसा होतो, यावर अवलंबून असतील. परंतु, समजा लोकांनी प्रो गोविंदाचे स्वागत केले तर क्रिकेटमध्ये पैसा आल्यावर जसे आयपीएल सुरू झाले, तसे कदाचित प्रो गोविंदाचेही वेगवेगळे संघ तयार होतील. कदाचित प्रताप सरनाईक, राम कदम, प्रकाश सुर्वे वगैरे राजकीय नेते हेच संघांचे मालक असतील.