मुंबई - भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्ती, अनिष्टांचे निर्दालन केले. त्यांच्या या जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन आपण अस्वच्छता, अनारोग्य आणि कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, राज्यात दहीहंडीचा उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे.
जन्माष्टमी नंतरच्या दहीहंडी उत्सवातही संयम राखूया. कृष्णाला सखा सर्वोत्तम मानले जाते. ते सर्व प्राणिमात्रांची आणि जीवलगांची काळजी वाहतात. त्यांना नमन करताना आपणही सर्वांची काळजी घेवूया. घरात राहूनच आरोग्यदायी हंडीची लयलूट करूया. दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र, मनसेनं दहीहंडी करणारच असा पवित्रा घेतला आहे.
राज्यात राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालते मग हिंदू सण साजरे करायला बंदी का? असा सवाल उपस्थित करत अविनाश जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसंच दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. नौपाडा येथील भगवती मैदानावर मनसेनं दहीहंडी कार्यक्रमासाठी स्टेज बांधण्यास सुरुवात केली होती. याठिकाणी पोलिसांनी काम थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मनसैनिकांनी आंदोलन सुरू केलं. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी जाधव यांना घटनास्थळी जावून समजवण्याचा प्रयत्न केला. पण मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आहे.
संदीप देशपांडेंना नोटीस
सरकारी आदेश झुगारून ठाण्यात दहीहंडी साजरी करण्याच्या तयारीत असणाऱ्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर आता दादरमध्ये दहीहंडी उभारण्यात येणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. दरम्यान, देशपांडे यांचे हे ट्विट समोर येताच दादर पोलीसांनी संदीप देशपांडेंच्या शाखेवर दाखल होऊन देशपांडेंसह संतोष धुरी यांना नोटीस दिली आहे.