Join us

यंदा बक्षिसांचे लोणी नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 9:13 AM

यंदाच्या वर्षी विविध दहीहंडी आयोजकांनी उत्सवातून माघार घेतल्याने गोविंदा पथकांमध्ये कमालीचे नाराजीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्तांच्या मदतीसाठी यंदाच्या वर्षी विविध दहीहंडी आयोजकांनी उत्सवातून माघार घेतल्याने गोविंदा पथकांमध्ये कमालीचे नाराजीचे वातावरण आहे.दहीहंडी समन्वय समितीने आयोजनातील भव्य-दिव्यता टाळून आयोजकांना पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.अत्यंत तुरळक आयोजकांवर उत्सवाची मदार असल्याने दहीहंडी पथकांना लाखो रुपयांचे बक्षिसाचे लोणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले.

मुंबई : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यंदाच्या वर्षी विविध दहीहंडी आयोजकांनी उत्सवातून माघार घेतल्याने गोविंदा पथकांमध्ये कमालीचे नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर दहीहंडी समन्वय समितीने आयोजनातील भव्य-दिव्यता टाळून आयोजकांना पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र यंदाच्या वर्षी अत्यंत तुरळक आयोजकांवर उत्सवाची मदार असल्याने दहीहंडी पथकांना लाखो रुपयांचे बक्षिसाचे लोणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील २-३ वर्षांपासून दहीहंडी उत्सव न्यायालयाच्या कचाट्यात अडकल्यामुळे त्यातील जल्लोष आणि उत्साह कमी झाला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजकांची लागणारी रीघ गृहीत धरून दहीहंडी पथकांनी दोन महिन्यांपासून दणक्यात सरावाला सुरुवात केली होती. परंतु, अचानक राज्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे या आयोजनातील ओघ कमी झाला आणि बड्या आयोजकांनी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आयोजन रद्द केल्यामुळे गोविंदाच्या उत्साहावरही काहीसे विरजण पडल्याचे दिसून आले आहे. परिणामी, या दहीहंडी पथकांना प्रायोजकांसाठीही वणवण करावी लागत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कचाट्यातून सुटलेला हा उत्सव यंदा दणक्यात साजरा होणार की बक्षिसांचे लोणी कुणालाच मिळणार नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

दहीहंडीची घागर यांच्यामुळे उताणी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहर- उपनगरातील बड्या आयोजकांनी आयोजनच रद्द केले आहे. यात वरळी जांभोरी मैदान येथील संकल्प प्रतिष्ठानचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. तर प्रकाश सुर्वे, कालीदास कोळंबकर, अरुण दूधवडकर, सदा सरवणकर, पांडुरंग सकपाळ यांनी उत्सवाचे आयोजन रद्द करून पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरविले आहे. याखेरीज, मागील काही वर्षांपासून ठाण्यातील दहीहंडी उत्सवांचेही या सणात वेगळे आकर्षण निर्माण झाले आहे. ठाण्यातील उत्सवांत जय जवान आणि माझगाव येथील गोविंदा पथकाने नऊ थरांचा विश्वविक्रम केला होता. परंतु यंदा ठाण्यातील आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजन विचारे यांनी सामाजिक भान राखून आयोजन रद्द केले आहे.

पोलीस सज्ज : दहीहंडी उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सर्वत्र तैनात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी, शहरातील तब्बल ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह वॉच टॉवरद्वारे संपूर्ण शहरावर नजर ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार, पोलिसांचे नियोजन सुरू आहे.

अशी आहे नियमावली

- १८ वर्षांखालील गोविंदांचा सहभाग नसावा.

- २० फुटांपेक्षा अधिक उंच दहीहंडी नसावी.

- सुरक्षिततेची उपकरणे अत्यावश्यक.

- मानवी मनोऱ्यावर पाण्याचा मारा करू नये.

- कच्च्या, जुन्या इमारतीला दहीहंडी बांधू नये.

- कायदा-सुव्यवस्थेची खबरदारी घ्यावी.

- दहीहंडीच्या ठिकाणी कर्कश्श डीजेचा वापर शक्यतो टाळावा.

- आपत्कालीन व्यवस्था असावी.

दहीहंडी उत्सव आपली परंपरा असल्यामुळे सामाजिक भान राखून साजरा झाला पाहिजे. मात्र आयोजकांनी आयोजन रद्द करू नये. दीड-दोन महिन्यांपासून सराव करणाºया गोविंदांसाठी साधेपणाने आयोजन करून त्यांना प्रोत्साहन द्यावे.

- बाळा पडेलकर, अध्यक्ष, दहीहंडी समन्वय समिती

 

टॅग्स :दहीहंडीमुंबईपोलिसपूर