दहीहंडीवर मंदीचे सावट; प्रायोजकांनी पाठ फिरवल्यामुळे आयोजक धास्तावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 04:43 PM2018-08-30T16:43:24+5:302018-08-30T16:43:39+5:30
मुंबईत मोठ्या थरांसाठी पूर्वी लाखोंच्या दहीहंड्या व आकर्षक बक्षिसांची रेलचेल होती. मात्र 8 नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदी आणि 1 जुलै 2017 पासून देशात लागू केलेल्या जीएसटीमुळे सध्या बांधकाम, हिरे बाजार, शेअर मार्केट, कपडा मार्केट, लोखंड मार्केट, किराणा मार्केट या विविध धंद्यांवर देखिल मंदीचे सावट आले आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबईत मोठ्या थरांसाठी पूर्वी लाखोंच्या दहीहंड्या व आकर्षक बक्षिसांची रेलचेल होती. मात्र 8 नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदी आणि 1 जुलै 2017 पासून देशात लागू केलेल्या जीएसटीमुळे सध्या बांधकाम, हिरे बाजार, शेअर मार्केट, कपडा मार्केट, लोखंड मार्केट, किराणा मार्केट या विविध धंद्यांवर देखिल मंदीचे सावट आले आहे. त्यामुळे प्रायोजकांनी यंदा दहीहंडी उत्सवासाठी मदतीचा हात आखडता घेतला आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरातील अनेक दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांनी आपल्या बक्षिसांच्या पूर्वीच्या रकमेत कपात केली असून यंदा या उत्सवाच्या खर्चावर देखिल कपात केली आहे.
दहीहंडी उत्सवाला पूर्वी मोठे कलाकार व अनेक सेलिब्रेटी येत असत.परंतू त्यांचे मोठे मानधन त्यातच प्रायोजकांनी पाठ फिरवल्यामुळे
यंदा अनेक मंडळाने देखिल सेलिब्रेटीच्या नेहमी होणाऱ्या खर्चात कपात केल्याची माहिती पश्चिम उपनगरातील एका दहीहंडी आयोजकांने दिली.
येत्या सोमवार दि.3 सप्टेंबर रोजी होणारा दहीकाला उत्सव कसा साजरा करायचा? या चिंतेत आयोजक व राजकीय पुढारी धास्तावलेले आहेत. जर दहीहंडी उत्सवासाठी स्पॉन्सरशिप द्या, आमच्या मंडळाला आर्थिक मदत करा अशी विनंती आयोजक प्रायोजकांना करत आहेत. पूर्वी आम्ही तुमच्या दही हंडी उत्सवाला सढळहस्ते मदत केली होती,मात्र यंदा आम्हाला माफ करा,खरच पैसे नाहीत अशी उत्तरे प्रायोजक देत आहेत. प्रायोजकांनी आपले मोबाईल देखिल बंद करून ठेवले आहेत, तर आमच्या फोन सुद्धा घेणे बंद केले आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे दहीहंडी यंदा धुमधडाक्यात साजरी न करण्याचा निर्णय पश्चिम उपनगरातील एका मोठ्या दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांनी घेतला असल्याची माहिती त्यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका येत्या 6 ते 7 महिन्यात एकत्र किंवा वेगळ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दहीहंडी उत्सवानंतर येणारे गणपती, नवरात्री, दिवाळी उत्सव कसे साजरे करायचे आणि निवडणुकीचा मोठा खर्च लक्षात घेता पैसा कुठून आणायचा, असा प्रश्न एका आमदाराने आपले नाव न छापण्याच्या अटीवर 'लोकमत'शी बोलताना उपस्थित केला.