आज आनंदाचा दिवस, उगाच कार्यकर्त्यांना एकमेकांशी भिडवू नका; आदित्य ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 03:15 PM2022-08-19T15:15:55+5:302022-08-19T15:16:38+5:30
Dahi Handi: गेली २ वर्ष कोविड काळात गेले. यंदा लोक उत्साहात बाहेर पडले आहेत. अनेक ठिकाणी मी जातोय असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबई - आज आनंदाचा दिवस आहे. साजरा करा. उगाच कार्यकर्त्यांना एकमेकांशी भिडवू नका. जांबोरी मैदानात आम्ही परवानगीच मागितली नव्हती. २ वर्षापूर्वी अडीच कोटी फंड देऊन सुशोभीकरण केले होते. उगाच राजकारण आणू नका. निवडणुका येतील तेव्हा येतील. पण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून बालिशपणा करू नका असा टोला वरळीचे शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनीभाजपाला लगावला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आज सगळीकडे उत्साह चांगला आहे. लहानपणापासून आम्ही हंडी बघतोय. आज सुरक्षित गोविंदा साजरा होतोय हे चांगले आहे. गेली २ वर्ष कोविड काळात गेले. यंदा लोक उत्साहात बाहेर पडले आहेत. अनेक ठिकाणी मी जातोय. दहिहंडी सगळीकडे साजरी होते. आजच्या दिवशी मला पोरकट राजकारणात जायचं नाही. आनंदाचा क्षण साजरा करायला. सगळ्यांना हा क्षण साजरा करू द्या असं त्यांनी सांगितले.
वरळी येथे सुनील शिंदे जी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवास उपस्थित राहिलो. येथील उत्सवात अंध तरुणांचे गोविंदा पथक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. त्यांच्या जिद्दीला सलाम! pic.twitter.com/zrxUpq5r9T
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 19, 2022
जांबोरीतील मैदानावरून शिवसेना-भाजपा आमनेसामने
वरळी मतदारसंघात दरवर्षी जांबोरी मैदानात सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहिकाला उत्सव साजरा केला जातो. परंतु यंदा जांबोरीच्या याच मैदानात भाजपानं दहिहंडी उत्सव आयोजित केला आहे. भाजपानं जांबोरी मैदान घेतलं त्यावरून शिवसेनेवर टीका होऊ लागली. ३ आमदार, १ खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही शिवसेनेला जांबोरी मैदान मिळालं नाही अशी टीका भाजपाकडून होऊ लागली. त्यामुळे शिवसेनेतही पक्षप्रमुख नाराज झाले होते. परंतु त्यानंतर श्रीराम मिल चौकात शिवसेनेकडून दहिहंडी उत्सव आयोजित करण्यात आला. त्याठिकाणी आमदार आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती.
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडायला सुरुवात झाली आहे. आता आम्ही मुंबई महापालिकेतही भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच आणि विकासरुपी मलाई आहे ती गरिबांपर्यंत घेऊन जाण्याचं काम करणार आहोत असं सांगत वरळीतील जांबोरी मैदानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. भाजपा मुंबईकडून जांबोरी मैदानात दहिहंडी उत्सव आयोजित करण्यात आला. त्याला फडणवीसांनी हजेरी लावली.