मनोहर कुंभेजकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वेसावे कोळीवाड्यात लांब लाकडी काठीला अणुकुचीदार भाला बांधून दहीहंडी फोडण्याची परंपरा आहे. येथील बाजार गल्ली कोळी जमात संस्थेला यंदा ही हंडी फोडण्याचा मान नऊ वर्षांनी मिळाला आहे. बाजार गल्लीसाठी हा मोठा उत्सव असून, याकरिता ५ लाखांचा खास पेहराव तयार करण्यात आला आहे. दहीहंडी उत्सवासाठी सुमारे २० लाख खर्च अपेक्षित आहे, असे बाजार गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष पराग भावे आणि खजिनदार हरिश्चंद्र भावे यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित वेसावे गावातून बाजार गल्ली कोळी जमात संस्थेची मिरवणूक निघणार आहे. मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास येथील दहीहंडी उत्सवाला सुरुवात होईल, असे प्रवीण भावे यांनी सांगितले.वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या माध्यमातून येथील श्रीराम मंदिरात कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने येथील आठ गल्ल्यांना हा उत्सव आणि हंडी फोडण्याचा दर नऊ वर्षांनी मान मिळतो. यंदा हा मान बाजार गल्लीला मिळाल्याची माहिती या संस्थेचे मानद सचिव मिकेश दवणे आणि वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष जगदीश भिकरू यांनी दिली. दहीहंडीच्या दिवशी वेसावे गावातील सर्व मानाच्या हंड्या भाल्याने फोडल्या जातात. तत्पूर्वी मानाच्या हंडीची मिरवणूक वेसावे गावातून काढली जाते. मानाच्या काठीची आरती केली जाते.खास या उत्सवासाठी गल्लीच्या दोन हजार नागरिकांसाठी तयार केलेला पेहराव हे या शोभायात्रा मिरवणुकीचे खास आकर्षण आहे.ही मिरवणूक सकाळी ११ च्या सुमारास श्रीराम मंदिर येथे आल्यानंतर बाजार गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष पराग भावे यांच्या हस्ते यंदाची हंडी भाल्याने फोडण्यात येणार आहे. त्यानंतर वेसावे गावातील नवसाच्या हंड्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत फोडल्या जाणार आहेत.>पिक्चर अभी बाकी हैं!रविवारी मोठ्या संख्येने आगमन सोहळे आटोपले असले, तरी अद्याप बड्या आणि नामांकित गणेशोत्सव मंडळांचे आगमन सोहळे येत्या काही दिवसांत पार पडणार आहेत.१९ आॅगस्टला ताडदेवचा विघ्नहर्ता, धोबी तलावचा महाराजा, खारचा लाडका, वॉर्डन रोडचा गणराज, घोडपदेवचा राजा, बोरीवलीचा चिंतामणी या गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाचे आगमन सोहळे पार पडतील.२० आॅगस्टला शिवाजी नगरचा राजा, मालवणीचा राजा, उमरखाडीचा राजा, मुंबईचा विघ्नहर्ता, जोगेश्वरीचा चिंतामणी, भोईवाड्याचा राजा, गणेशबागचा राजा, राजा आग्रीपाड्याचा, गोविंद नगरचा राजा, गोरेगावचा महाराजा या गणेशमूर्तींचे आगमन पार पडणार आहे.२२ आॅगस्टला ऐरोलीचा राजा, ड्युक्सचा राजा, विद्याविहारचा लाडका, शंकरवाडीचा विघ्नहर्ता या मंडळांच्या आगमन सोहळ्यांची धूम असेल.२३ आॅगस्टला जोगेश्वरीचा राजा नाचत-गाजत येईल.२४ आॅगस्टला कांदिवलीचा राजा, विलेपार्लेचा राजा, गोकुळधामचा विघ्नहर्ता, माहीमचा महाराजा, अंधेरीचा गणराज, इंदिरा नगरचा राजा, मेघवाडीचा राजा या गणपतींच्या आगमन सोहळ्यासाठी मुंबईकर सज्ज असतील.२५ आॅगस्टला,गणेश चतुर्थी दिवशी आंबोलीचा राजा, सर्वोदयचा राजाचा आगमन सोहळा आहे.>सरावाचा अखेरचादिवस जल्लोषात‘गोविंदा रे गोपाळा...’च्या गजरात रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेला गोविंदा पथकांचा अखेरचा सराव दणक्यात पार पडला. न्यायालयाच्या तिढ्यातून सुटका मिळाल्याने दहीहंडी दणक्यात साजरी करण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत.
वेसावकर फोडणार भाल्याने दहीहंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 1:59 AM