Dahi Handi: येत्या ५ वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, प्रताप सरनाईक यांचं मोठं विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 02:29 PM2022-08-02T14:29:33+5:302022-08-02T14:30:51+5:30
ठाण्यात अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा करणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या ५ वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल असं म्हटलं आहे.
ठाण्यात अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा करणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या ५ वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल असं म्हटलं आहे. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली मागणी मान्य करत दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व गोविंदांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. २० ते २२ दिवस आधीच सुट्टी जाहीर केल्यामुळे गोविंदा पथकात उत्साहाचं वातावरण आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं मी याबाबत अभिनंद करतो, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
"कोरोना काळात आपल्याला पूर्णपणे सण साजरा करता आला नाही. पण दहीहंडी व्यतिरिक्त आपण इतर ठिकाणीही मदत केली आहे. आनंद दिघे साहेबांनी दहीहंडीला सुरुवात केली आणि त्यांच्यामुळे ठाण्यात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी होऊ लागली. गेले दोन वर्ष उत्साह नसल्याने गोविंदा पथक नाराज होते. दहीहंडीचा उत्सव क्रीडा प्रकारात समाविष्ट व्हावा यासाठी हे सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी मला खात्री आहे. हे सरकार गोविंदाचे सरकार आहे", असं सरनाईक म्हणाले.
"स्पेनमध्ये हा क्रीडा प्रकार आहे आणि ते जगात हा खेळ घेऊन जातात. क्रीडा प्रकारात हा उत्सव जर मोडला गेला तर तरुणांना वाव मिळेल आणि याचा फायदा नोकऱ्यांमध्ये देखील तरुणांना होईल. गोविंदा पथकांना मिळणारा पैसा ते योग्य कामात वापरत असतात. प्रत्येक पैशाचा हिशोब त्यांच्याकडे असतो. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आहेत. त्यामुळे हा सण राष्ट्रीय होण्यासाठी वेळ लागणार नाही. येत्या ५ वर्षात हा खेळ ऑलिम्पिकमध्येही समाविष्ट होईल", असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
विक्रम रचणाऱ्या गोविंदा पथकाला २१ लाखांचं बक्षीस
गेली दोन वर्ष गोविंदा न झाल्यामुळे गोविंदा पथकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. नऊ थरांचा जागतिक विक्रम याच ठिकाणी झाला होता. जय जवना पथकानं तो मोडला होता. या वर्षी नवा विक्रम रचणाऱ्यांना २१ लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर करतो, अशी घोषणा सरनाईक यांनी केली. तसंच प्रत्येक गोविंदाचा अपघात विमान असणं बंधनकारक असल्याचंही ते म्हणाले. न्यायालयाच्या आणि सरकारच्या नियमावलीनुसारच सण साजरा केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.