मुंबई, दि. 15 - यंदा स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव एकाच दिवशी आल्याने, चाकरमानी मुंबईकरांना थरांचे स्वातंत्र्य अनुभवायला मिळत आहे. देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना, गोविंदांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या कचाट्यातून सुटलेला दहीहंडी उत्सव, यंदा जोश-जल्लोषात साजरा करण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. मागील काही वर्षांत न्यायालयीन निर्बंधांमुळे संभ्रमावस्थेत असलेल्या उत्सवावर भीतीचे सावट दिसून आले. मात्र, यंदा गोविंदा पथके सर्व निर्बंध झुगारून ‘करून दाखविणारच’ या निर्धाराने मैदानात उतरताना दिसत आहेत. काळाचौकी, लालबाग, परळ, दादर, वरळी परिसरांमध्ये तर दहीहंडी फोडायला सुरुवातदेखील झाली आहे.
उच्च न्यायालयाने बालगोविंदाचे वय कमी करून १८ वरून १४ केले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचे पालन गोविंदा पथके करणार, याकडे पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.
दादर फुलमार्केटमधील दहीहंडी (फोटो - दत्ता खेडेकर)
उत्सवादरम्यान सूचनांचे पालन करण्याचे आवाहन दहीहंडी समन्वय समितीने व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे. तर याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनीही थरांची उंची गाठताना कुटुंबाचा विचार करा, असे आवाहन केले.
ठाणे - मनसेने आयोजित केलेली दहीहंडी
दहीहंडी आणि स्वातंत्र्यदिन साजरा करणारा गोविंदा
पोलिसांचे सुरक्षा कवच : मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवान, शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी तैनात राहतील. केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १५ तुकड्या, एटीएस, शीघ्रकृती दल तैनात असून अतिरेकी कारवायांच्या शक्यतेतून गुप्तचर तपास यंत्रणाकार्यरत असतील, असे कायदा व सुव्यवस्थाचे प्रमुख सहायुक्त देवेन भारती यांनी सांगितले होते. ड्रोनसह ५ हजार सीसीटीव्हींचा वॉच असणार आहे.
यंदा १० थर : माझगाव ताडवाडी गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांचा विक्रम केला आहे. यंदा याच्याही एक पाऊल पुढे जात दहा थर लागणार आहेत. उपनगराचा राजा मानल्या जाणा-या जय जवान गोविंदा पथकाने या विक्रमासाठी कसून तयारी केली आहे. याशिवाय दादरमधील कलाकारांचा दहीहंडी मुंबईकरांसाठी औत्सुक्याचा विषय आहे.
काळाचौकीत गोविंदांसाठी सेफ्टी बेल्ट
सेफ्टी बेल्टसह रूग्णवाहिका आणि अन्य सुरक्षा साधनांसह दहिकाला उत्सवात माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाने 7 थरांची सलामी देत काळाचौकीवासियांची वाहवा मिळवली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभेतर्फे हा दहीकाला उत्सव आयोजित करण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे, काळाचौकीतील भगतसिंह मैदानात गोविंदांकडून मनोरे रचतेवेळी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव हे उत्सवानिमित्त पक्षीय मतभेद विसरून एकत्रितपणे गोविंदांना प्रोत्साहन देताना दिसले.
नवी मुंबई जुईनगर सेक्टर 25 मधील अजिंक्य सोसायटीमध्ये संघर्ष मित्र मंडळातील 13 वर्षीय मुलीने दहीहंदी फोडली.