लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्या सरकारचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचविण्याला असल्याचे सांगत यंदाही दहीहंडीचा उत्सव होणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सणवार, उत्सव बाजूला ठेवून जनतेचे प्राण वाचविण्याला आम्ही प्राधान्य दिले हा संदेश जाऊ द्या, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर विरोधाचे सूर उमटले असून, भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गोविंदा पथकांच्या प्रमुखांशी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधला. गेल्या दोन लाटेत जी बालके अनाथ झाली, ज्यांच्या घरातील कर्ते पुरुष किंवा महिला गेल्या, कुटुंबच्या कुटुंब अनाथ झाली, त्याची कारणे समजून घेण्याची गरज आहे. दोन लाटेतील आपला अनुभव भयानक आहे. आपलाच नाही तर जगाचा अनुभवही कटू आहे. दोन डोस दिलेल्या देशातही तिसऱ्या लाटेने आता कहर मांडला आहे. अनेक देशांत पुन्हा निर्बंध लावले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. इतर रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी ७५० मेट्रिक टनच्या वर गेल्यास आपल्याला नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार बाळा नांदगावकर आदी उपस्थित होते.
श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्याच ठिकाणी कमी उंचीची दहीहंडी फोडली जाईल. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच यात सहभागी करून घेऊ, गर्दी होणार नाही, याची दक्षता मंडळे घेतील, अशी भूमिका गोविंदा पथकांच्या समन्वय समितीने बैठकीत मांडली. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीला परवानगी दिली जाणार नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा समाजहिताचा असल्याने आम्ही त्याचे समर्थन करतो, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी पत्रकारांना दिली. जय जवान गोविंदा पथकाचे विजय निकम यांनी मागणी केली की, मुख्यमंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करावा. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना दहीहंडी उत्सवात सहभागी होण्याची परवानगी द्यावी. भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला असून, घाटकोपरमध्ये आम्ही दहीहंडी फोडणारच, असे सांगितले.
कोरोना निर्बंधांविरुद्ध आंदोलन करण्याची भाषा काहीजण करतात. त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
संसर्ग हाताबाहेर गेला तर आतापर्यंत निर्बंधांचे कठोर पालन करून मिळालेले यश वाया जाईल. सगळे सण, उत्सव घरात राहून साजरे केले. शासनाला सहकार्य केले तसेच यापुढेही केले पाहिजे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
दहीहंडी उत्सवात तरूणवर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होतो. जो ३५च्या आतल्या वयोगटातील असतो. अजूनही आपल्याकडे या वयोगटातील युवकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
- इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका
डेल्टा प्लस हा विषाणू घातक असून, तो वेगाने पसरत आहे. दहीहंडी पथकातील एखाद्या गोविंदाला जरी लागण झालेली असेल तर पूर्ण चमू ताबडतोब बाधित होण्याची भीती असेल.
- डॉ. संजय ओक, अध्यक्ष, टास्क फोर्स
दहीहंडीचे प्रकरण न्यायालयात असताना, ‘दहीहंडी काय गोविंदांनी पाकिस्तानात जाऊन फोडायची का’ असा प्रश्न काही वर्षांपूर्वी करणाऱ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना दहीहंडी उत्सवाला मनाई करणे दुर्दैवी आहे.
- आशिष शेलार, भाजपचे नेते