‘टाइम्स स्क्वेअर’मध्ये दहीहंडी अधांतरी

By admin | Published: September 11, 2014 01:21 AM2014-09-11T01:21:42+5:302014-09-11T01:21:42+5:30

यंदा भारतात नोव्हेंबरमध्ये दिवाळी साजरी होणार आहे. मात्र त्याआधीच या महिन्यातच अमेरिकेत दिवाळीचे फटाके फुटतील

DahiHindi subdivision in 'Times Square' | ‘टाइम्स स्क्वेअर’मध्ये दहीहंडी अधांतरी

‘टाइम्स स्क्वेअर’मध्ये दहीहंडी अधांतरी

Next

मुंबई : यंदा भारतात नोव्हेंबरमध्ये दिवाळी साजरी होणार आहे. मात्र त्याआधीच या महिन्यातच अमेरिकेत दिवाळीचे फटाके फुटतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकेतील ‘टाइम्स स्क्वेअर’ फेस्टिव्हलमध्ये दीपोत्सव साजरा करणार आहे. परंतु, यंदा मात्र फेस्टिव्हलमध्ये दहीहंडीच्या समावेशाबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.
फेस्टिव्हलसाठी लागणाऱ्या निधीची जबाबदारी गोविंदा पथकांच्या खांद्यावर आल्यामुळे दहीहंडीचे थर ‘अधांतरी’ असल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी मल्लखांबाचा चमू अमेरिकेला रवाना करण्यात आला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये घोर निराशा पसरली असून या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ते मंत्र्यांकडे साकडे घालत आहेत.
न्यूयॉर्क येथील ‘टाइम्स स्क्वेअर’ या प्रेक्षणीय स्थळाला दररोज हजारो पर्यटक भेट देतात. त्यामुळे याला वेगळे महत्त्व आहे. या ठिकाणी यंदा महाराष्ट्राची पताका झळकणार असून येत्या २० सप्टेंबरलाही हा फेस्टिव्हल दणक्यात साजरा होणार आहे. यंदा या फेस्टिव्हलमध्ये गोपिकांचा ‘थरथराट’ अनुभवण्याची संधी मिळणार होती. परंतु आता मात्र या फेस्टिव्हलमध्ये मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहायला मिळतील.
यंदा या फेस्टिव्हलमध्ये मुंबईतील राजेश मुडकी यांचा मल्लखांबाचा चमू सादरीकरण करणार आहे. या फेस्टिव्हलसाठी एकूण १८ मल्लखांबपटूचा चमू अमेरिकेला रवाना झाला आहे. गोविंदा पथकांना डावलल्यामुळे पथकांमध्ये निरुत्साह असून फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी पर्यटन मंत्र्यांपासून दहीहंडी आयोजकांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी हा अखेरचा आठवडा असून मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी महिला गोविंदा पथके समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली येरझाऱ्या घालत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: DahiHindi subdivision in 'Times Square'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.