लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या दहीकाला आणि काही दिवसांच्या प्रतीक्षेत असलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह अवघ्या मुंबापुरीत ओसंडून वाहत आहे. दहीकाला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी सराव शिबिरांमधून गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला असून लाडक्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यांचा धूमधडाकाही रविवारी मुंबईकरांनी अनुभवलास्वातंत्र्यदिनी होणाºया दहीहंडी उत्सवाचा थरार कोणत्या थरापर्यंत जाणार याची पुसटशी कल्पना सराव शिबिरांत दिसून आली. त्यामुळे रविवारी सराव शिबिरांतून गोविंदा पथकांनीही दहीहंडीची रंगीत तालीम केली. लाउडस्पीकर व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र त्याचा कोणताही परिणाम सरावावर झाल्याचे शिबिरांमध्ये दिसलेनाही. याउलट गोविंदांनी सराव शिबिरांमध्ये कडक सलामी देत आपण कसून केलेल्या सरावाची पावतीच फाडली.रविवारच्या सुटीचा पुरेपूूर फायदा घेत बहुतेक मंडळांनी गणेशमूर्ती आगमन सोहळ्यांचे आयोजन केले होते. ढोल-ताशांच्या जोडीला डीजेची साथ लाभल्याने अवघा गिरणगाव दणाणून सोडला. या वेळी हजारोंच्या संख्येने एकवटलेल्या बाप्पाच्या भक्तांनी अवघे लालबाग-परळ स्तब्ध केले.रविवारी आयोजित आगमन सोहळ्यांत प्रामुख्याने चिंचपोकळीचा चिंतामणी, अॅण्टॉप हिलचा राजा, डोंगरीचा राजा, ताडदेवचा राजा, फोर्टचा राजा या गणपतींच्या आगमन सोहळ्याला तोबा गर्दी झाली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात आज तब्बल ३२ आगमन सोहळे पार पडले.तरुणांचा आलेख चढाच...गेल्या काही वर्षांत सातत्याने आगमन सोहळ्यांत येणाºया तरुणाईच्या संख्येत यंदाही वाढच दिसली. महाविद्यालयांना सुट्टी असल्याने महाविद्यालयीन तरुणांनी आगमन सोहळ्यांत मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. ढोल-ताशांच्या तालावर देहभान विसरून तरुण बेफाम नाचत होते.सूचनांपेक्षा घोषणाच जास्तरेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक असल्याने गणेशभक्तांनी सकाळी लवकरच रेल्वे स्थानकांवर धाव घेतली होती. दक्षिण मुंबईकडे येणाºया प्रत्येक लोकलमध्ये आगमन सोहळयासाठी निघालेल्या तरुणांनी गर्दी केली होती. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवरील फलाटांवर नियंत्रण कक्षांकडून देण्यात येणाºया सूचनांहून गणेशभक्तांमधून देण्यात येणाºया ‘गणपती बाप्पा... मोरया...’ या घोषणाच अधिक ऐकू येत होत्या.
दहीकाल्यात आगमन सोहळेही रंगले़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 1:57 AM