दहिसर ते वांद्रे कांदळवन क्षेत्र होणार झोपडीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:59 AM2018-12-15T00:59:49+5:302018-12-15T01:00:19+5:30
१ हजार ४३५ हेक्टर परिसर; ४२३ पैकी राहिल्या केवळ ४५ झोपड्या, कारवाईला वेग
- सागर नेवरेकर
मुंबई : दहिसर-वांद्रे परिसरातील १ हजार ४३५ हेक्टरवरील कांदळवनात ४२३ होत्या, त्यांपैकी आता अवघ्या ४५ झोपड्या उरल्या असून येत्या काही काळात त्या काढल्या की पश्चिम उपनगरातील कांदळवन झोपडीमुक्त होईल.
पश्चिम मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी यासंदर्भात सांगितले की, चारकोप आणि मालवणी परिसरात डेब्रिजची समस्या मोठी होती. भूमाफियांकडून कांदळवन परिसरात डेब्रिज टाकून अनधिकृतरीत्या झोपड्या बांधल्या जातात. चारकोपमध्ये आठ ते दहा दिवसांपूर्वी एक डेब्रिज वाहन ताब्यात घेण्यात आले होते. तीन आरोपींना अटक झाली. एका डेब्रिज वाहनावर कारवाई सुरू आहे. मालवणीमध्ये आॅक्टोबरमध्ये डेब्रिजच्या पाच गाड्या पकडण्यात आल्या होत्या. मागील महिन्यात १६ आरोपींना पकडून एक मोठी कारवाई करण्यात आली. तसेच कांदळवन विभागात पार्किंग लॉट तयार करून व्यवसाय केला जात होता. पार्किंग गाड्या ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंड आकारण्यात आला आहे. कांदळवन परिसरातील आतापर्यंत दोन पार्किंग लॉटवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईतून ५ लाख २८ हजार रुपये दंड वसूल करून शासनाकडे जमा करण्यात आला आहे.
बोरीवली, कांदिवली, मालवणी, चिकूवाडी आणि मार्वे येथील अनधिकृत झोपड्यांवर तोड कारवाई करण्यात आली. उर्वरित काही झोपड्यांवर जानेवारी महिन्यापर्यंत तोड कारवाई केली जाईल. दहिसर येथील गणपत पाटील नगर, गोरेगाव पहाडी परिसर, वर्सोवा येथे सरकारी किंवा खासगी जमिनीवर झोपड्या वसल्या आहेत. खासगी कांदळवन परिसरातील कडेकडेला झोपड्या वसलेल्या दिसून येतात. सर्व झोपड्या या ५० मीटरच्या क्षेत्रात तयार होत आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.
१ हजार ४३५ हेक्टर परिसरात अतिक्रमण झाले होते. ते कांदळवन अधिकाऱ्यांनी कारवाई करून हटविले; तसेच कुर्ला १ हजार ०४३.५२ हेक्टर, अंधेरी १०६.५९ हेक्टर आणि बोरीवली ६२४.७२ हेक्टर असा एकूण १ हजार ७७४.८४ हेक्टर खासगी जागा आहे. या जागेवरही कांदळवन निर्माण झाले आहे.
अनधिकृत झोपड्यांची माहिती घेऊन टप्प्या-टप्प्याने कारवाई करण्यात आली. पश्चिम भागात जास्त अनधिकृत झोपड्या वसलेल्या होत्या. अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केल्यावर तेथे पुन्हा झोपड्या बांधल्या जाऊ नयेत, यावरही लक्ष देण्यात आले आहे. ज्या जागेवरून झोपड्या हटविण्यात आल्या आहेत, तेथे पुन्हा तिवरांची झाडे निर्माण होत आहेत. मुंबईमधील कांदळवन परिसरात एकही झोपडी निर्माण होता कामा नये, हे आमचे ध्येय आहे.
- एन. वासुदेवन, कांदळवन क्षेत्राचे प्रमुख, राज्य वनविभाग
डेब्रिज डम्पिंगवर गेल्या दोन महिन्यांमध्ये परिणामकारक कारवाई झालेली आहे. तिथे आता डेब्रिज डम्पिंग आणि कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वीपासूनची अतिक्रमण होती. त्यातली ९० टक्के अतिक्रमणांवर कारवाई करून झोपड्या काढून टाकण्यात आल्या आहे, तसेच पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, अशी योजना केली आहे.
- विकास जगताप, विभागीय वन अधिकारी, कांदळवन विभाग.