Join us  

दहिसर-भाईंदर एलिव्हेटेड रखडणार; बांधकामासाठी पालिकेला मिळेना कंत्राटदार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:00 PM

दहिसर चेकनाका येथून मुंबईत येताना किंवा ठाणे, विरार, गुजरातला जाताना पश्चिम द्रुतगती मार्ग हा एकच पर्याय आहे.

मुंबई : मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या दहिसर येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने दहिसर ते भाईंदरपर्यंत एलिव्हेटेड लिंक रोड बांधण्याचा निर्णय घेतला. या मार्गामुळे मुंबईतून भाईंदर, वसई, विरार, पालघरसह गुजरात, दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची कोंडीतून सुटका होणार असून २०२५ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे; मात्र एलिव्हेटेड मार्ग बांधण्यासाठी पालिकेला कंत्राटदार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत. 

दहिसर चेकनाका येथून मुंबईत येताना किंवा ठाणे, विरार, गुजरातला जाताना पश्चिम द्रुतगती मार्ग हा एकच पर्याय आहे. त्यामुळे दहिसर चेक नाक्यावर सकाळ-संध्याकाळ नेहमीच वाहतूक कोंडी होते. यासाठी दहिसर ते भाईंदरपर्यंत पाच किमीचा एलिव्हेटेड मार्ग बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दहिसर ते भाईंदरपर्यंत पाऊण तास लागतो; मात्र हे अंतर दहा मिनिटांत कापता येणार आहे.

अनेकदा वाढविली मुदत 

ऑक्टोबर २०२२ मध्ये या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आली होती; मात्र एकही कंत्राटदार निविदा भरण्यास उत्सुक नाही. त्यानंतर पालिकेने पुन्हा- पुन्हा या प्रकल्पासाठी निविदेची मुदत वाढविली आहे.

५ हजार कोटींचा खर्च

दहिसर पश्चिमेतील खाडी भागातून हा मार्ग जात भाईंदर पश्चिमेतील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाकडे उड्डाणपुलाने जोडला जाणार आहे. त्यासाठी मिठागर क्षेत्रातील काही जागा पालिका ताब्यात घेणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास ५ हजार कोटी खर्च येणार आहे. 

७२ टक्केकोस्टल रोडचे काम पूर्ण

मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर पालिकेकडून कोस्टल रोड बांधला जात आहे. या कोस्टल रोडचे ७२ टक्के काम पूर्ण झाले असून वर्षभरात हा कोस्टल रोड बांधून पूर्ण होणार आहे. दहिसर मीरा भाईंदर एलिव्हेटेड मार्ग देखील किनाऱ्याहून जाणार असल्याने हा रोड भविष्यात कोस्टल रोड अथवा लिंक रोडला जोडला जाऊ शकतो.

 

टॅग्स :रस्ते वाहतूक