दहिसरला मिळणार पाच कोटी लीटर पाणी; अग्निशमन दलाला होणार पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 03:17 AM2019-07-05T03:17:39+5:302019-07-05T03:17:57+5:30
दहिसर नदीच्या पाणीसाठ्यातून पाण्याची पातळी वाढेल.
मुंबई : पश्चिम उपनगरातील तिन्ही नद्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी दहिसर नदीवर मुंबईतला पहिला कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. आता हा बंधारा पाच कोटी लीटर पाणी अडविण्यासाठी सज्ज झाला आहे. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने हा बंधारा बांधण्यात आला असून हा पहिला प्रयत्न यशस्वी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे दहिसर नदीवर आणखी चार कोल्हापुरी बंधारे बांधण्याची चर्चा सुरू आहे.
दहिसर नदीच्या पाणीसाठ्यातून पाण्याची पातळी वाढेल. तसेच पाणी जमिनीमध्ये मुरून राहील. त्यामुळे नदीच्या आजूबाजूच्या विहिरी, बोरवेलमध्ये बारमाई पाणी उपलब्ध होईल. महापालिकेच्या माध्यमातून दहिसर नदीचे पाणी शौचालय, उद्यान, अग्निशमन दल इत्यादींसाठी वापरले जाऊ शकते. पाणी आठ महिने साठून राहिल्याने भूजल पातळीची झीज होणार नाही. याशिवाय बंधाऱ्याच्या ९०० मीटरच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे सांडपाणी सोडले जात नाही. परंतु, सांडपाणी पुन:प्रक्रिया प्रकल्पासाठी ई-निविदा प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे, अशी माहिती रिव्हर मार्चचे सदस्य विक्रम चोगले यांनी दिली.
या वर्षी मे महिन्यामध्ये बंधाºयाचे काम पूर्ण झाले. दहिसर नदीवरील कोल्हापुरी बंधाºयाला एकूण तीन दारे आहेत. मुंबईमध्ये जेव्हा पहिला मुसळधार पाऊस पडला, त्या वेळी बंधाºयाचे दार उघडण्यात आले होते. सध्या कोल्हापुरी बंधाºयाचे दार उघडे ठेवण्यात आले असून परतीच्या पावसामध्ये पुन्हा दार बंद केले जाईल. त्यानंतर बंधाºयामध्ये पाच कोटी लीटर पाणी साचून राहील. कोल्हापुरी बंधारा बांधण्यासाठी आर्ट आॅफ लिव्हिंगने २२ लाख रुपयांचा निधी दिला होता. महानगरपालिका व वनविभागाकडे हा कोल्हापुरी बंधारा सोपविण्यात आला आहे. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने दहिसर नदीवर आणखी चार कोल्हापुरी बंधारे बांधण्याचा मानस आहे. दौलतनगर येथे दुसरा बंधारा बांधण्याची योजना आखली जात आहे, असे रिव्हर मार्च टीमने सांगितले.