दहिसर -मीरा भाईंदर उन्नत मार्ग बुलेट ट्रेनपेक्षा महाग
By जयंत होवाळ | Published: February 16, 2024 06:04 PM2024-02-16T18:04:11+5:302024-02-16T18:04:29+5:30
उन्नत मार्गाच्या खर्चाचा पुन्हा आढावा घेण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दहिसर - मीरा भाईंदर उन्नत मार्गाच्या खर्चावरून प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी प्रति किलोमीटर जितका खर्च येणार आहे, त्यापेक्षा जास्त खर्च उन्नत मार्गाच्या प्रति किलोमीटरसाठी येणार असल्याचा दावा वॉचडॉग फाउंडेशनने केला आहे. त्यामुळे उन्नत मार्गाच्या खर्चाचा पुन्हा आढावा घेण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
५०८ किमीच्या मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी १ लाख आठ हजार कोटी रुपये खर्च येणार होता. मात्र भूसंपादनाचे काम खूप रखडल्याने या प्रकल्पचा खर्च वाढून तो १ लाख ६५ हजार रुपयांवर गेला. बुलेट ट्रेनचा मार्ग बांधण्यासाठी प्रति किमी ३२५ कोटी रुपये एवढा खर्च आहे. दहिसर-मीरा भाईंदर मार्ग हा तर जेमतेम पाच किमीचा आहे. या मार्गासाठी एकूण तीन हजार कोटी रुपये खर्च आहे. तर या पुलाच्या प्रति किमी बांधणीसाठी ६०० कोटी रुपये खर्च येणार आहे, असा दावा फाउंडेशनने केला आहे. पलिकेच्या अलीकडच्या काळातील अनेक प्रकल्पांच्या निविदेत वाढीव खर्च दिसून येऊ लागला आहे. खर्चातील फरकही थोढाथोडका नसून अव्वाच्या सव्वा आहे. पालिका बांधत असलेला उन्नत मार्ग हा आधी एमएमआरडीए बांधणार होते. मात्र आता संपूर्ण जबाबदारी पालिकेवर आली आहे. या पुलाचा अर्धा भाग मुंबईच्या हद्दीबाहेर येतो. मूळच्या मुंवईकर माणसाला या पुलाचा किती फायदा होणार आहे आणि तो पालिकेने बांधणे किती व्यवहार्य ठरणार आहे, असा सवाल आम्ही मध्यन्तरी केला होता. तरीही या पुलाच्या खर्चाचा भार पालिकेला सहन करावा लागत आहे .
पालिकेने या पुलासाठी येणाऱ्या खर्चाचा पुन्हा आढावा घ्यावा, एवढा खर्च कसा , याची तपासणी करावी आणि जर खर्च तेढाच असेल तर तो संयुक्तिक कसा काय याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी फाउंडेशन राज्य सरकारला पात्र लिहून केली आहे.
या उन्नत मार्गाचा काही भाग मुंबई महापालिकेच्या हद्दीत आहे, तर काही भाग एमएमआर विभागात आहे. एमएमआर हद्दीतील पुलाच्या बांधकामाच्या खर्चाची प्रतिपूर्ती एमएमआरडीए करेल, अशी पालिकेला अपेक्षा होती. मात्र खर्च देण्यास एमएमआरडीएने नकार दिला आहे. साहजिकच पालिकेला सगळा खर्च करावा लागणार आहे. आधीच पालिकेवर विविध प्रकल्पांच्या खर्चाचे ओझे आहे. त्यासाठी आर्थिक तजवीज करताना पालिकेच्या नाकीनऊ आले आहेत. सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे पालिकेचे विविध प्रकल्प आहेत.