लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या दहिसर येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिका प्रशासनाने दहिसर ते भाईंदरपर्यंत एलिव्हेटेड लिंक रोड बांधण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र हा प्रकल्प रखडण्याचीच चिन्हे जास्त आहेत. हा एलिव्हेटेड मार्ग बांधण्यासाठी पालिकेला कंत्राटदार मिळेनासा झाला असून, पालिकेने निविदेला पाचव्यांदा मुदतवाढ दिली आहे.
दहिसर चेक नाका येथून मुंबईत येताना किंवा ठाणे, विरार, गुजरातला जाताना पश्चिम द्रुतगती मार्ग हा एकच पर्याय आहे. त्यामुळे मुंबईचे एन्ट्री पॉइंट असलेल्या दहिसर चेक नाक्यावर सकाळ संध्याकाळ नेहमीच ट्रॅफिक जाम असते. यावर उतारा म्हणून दहिसर ते भाईंदरपर्यंत नवीन पाच किमीचा एलिव्हेटेड मार्ग बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सध्या दहिसर ते भाईंदरपर्यंतच्या प्रवासास वाहनचालकांना किमान पाऊण तास लागतो. मात्र या एलिव्हेटेड मार्गामुळे हे अंतर फक्त दहा मिनिटात कापता येणार आहे.
या प्रकल्पासाठी जवळपास ३ हजार कोटी खर्च करण्यात येणार असून, ऑक्टोबर २०२२ मध्ये या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र एकही कंत्राटदार निविदा भरण्यास उत्सुक नाही. त्यानंतर पालिकेने पुन्हा पुन्हा या प्रकल्पासाठी निविदेची मुदत वाढवली. पालिकेने पाचव्यांदा निविदेला मुदतवाढ दिली असून, ७ जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.