मुंबई, दि. 17 - 900 किलो टोमॅटो चोरुन खळबळ उडवून देणा-या चोराला दहिसर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. 28 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना 54 वर्षीय आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळालं आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींचं नाव चंद्रशेखर राधेशाम गुप्ता असून कुर्लामध्ये राहतो. आरोपी चंद्रशेखर कुर्लामध्ये सामान वाहतूक करण्याचं काम करतो. चोरीसाठी ज्या टेम्पोचा वापर करण्यात आला, तो साई टेम्पो सर्व्हिसचा मालक असलेल्या चंद्रशेखर गुप्ताचाच आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मंगळवारी चंद्रशेखर गुप्ताला कुर्लामधून अटक केली आहे.
आणखी वाचा
टोमॅटोला सोन्याचा भावमुंबई - टोमॅटोला सोन्याचा भाव, दहिसरमधून 900 किलो टोमॅटो चोरीलाटोमॅटोला सोन्याचा भाव
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै रोजी टोमॅटो विक्रेता जगत श्रीवास्तव याने दहिसर पोलीस ठाण्यात अविनाश कंपाऊंडमधील भाजी मार्केटमधून 57 हजार रुपये किंमतीचे टोमॅटो चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. यावेळी साई टेम्पो सर्व्हिसचा लिहिलेला एक संशयित टेम्पो त्यांना सीसीटीव्हीत दिसला. याआधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला कुर्लामधून अटक केली आहे. आरोपीला 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण - दहिसर पोलीस ठाण्यात 25 हजार किंमतीचे 300 किलो टोमॅटो चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तक्रारदार टोमॅटो विक्रेता जगत श्रीवास्तव यांनी एकूण 900 किलो टोमॅटो चोरीला गेल्याचा दावा केला होता.
जगत श्रीवास्तव यांचे शेजारी रामप्रकाश सिंह यांनी सांगितलं होतं की, "जगत गेल्या 12-13 वर्षांपासून टोमॅटोचा व्यवसाय करत आहे. डोंगरीमध्ये राहणारे जगत दिवसाला 300 रुपये भाड्यावर दुकान चालवतात. चोरांनी इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या बाजारात प्रत्येक कॅरेटमागे दोन हजार रुपये भाव सुरु आहे. वाशी मार्केटमध्ये हा माल नेला जातो. तिथे सर्व व्यवहार उधारीवर असतो. अशा परिस्थितीत, ही चोरी झाल्यामुळे व्यापा-यांना चिंता लागली आहे.
पोलीस 900 किलोऐवजी फक्त 300 किलो टोमॅटो चोरी झाल्याची तक्रार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप जगत श्रीवास्तव यांनी केला होता. यामुळेच आपण 300 किलो टोमॅटो चोरी झाल्याची तक्रार केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पोलीस हे प्रकरण गंभीरतेने घेत नसून, सीसीटीव्हीत दिसलेल्या साई समर्थ टेम्पोबद्दल माहिती देऊनही कारवाई केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला होता. दहिसर पोलिसांनी जगत श्रीवास्तव यांच्या तक्रारीच्या आधारे अज्ञातांविरोधात चोरीची तक्रार नोंद केली होती.