Join us

तबेल्यांनी दहिसर नदी बनवली ‘शेणाची नदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 1:15 AM

बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळून वाहणाऱ्या दहिसर नदीला आता ‘शेणाची नदी’चे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मुंबई : बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळून वाहणाऱ्या दहिसर नदीला आता ‘शेणाची नदी’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. दहिसर नदीला लागून २२ तबेले आहेत. या तबेल्यातील जनावरांचे मलमूत्र थेट नदीमध्ये सोडले जाते. सध्या दहिसर नदीमध्ये सहा इंचाचा शेणाचा थर जमा झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून नदीतला शेणाचा थर काढण्यासाठी महापालिकेकडे स्थानिक रहिवासी खेपा घालतआहेत. परंतु महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.दहिसर नदीमध्ये सहा इंचाचा थर साचला असून त्याबाबत महापालिकेच्या आर/मध्य विभागाला माहिती देण्यात आली आहे. नदीच्या मार्गात नऊ शाळा आहेत. त्यांना शेणातून निघणाऱ्या मिथेन वायूचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे शालेय मुलांच्या आरोग्यावर मिथेन वायूचा परिणाम होतोय. नदीच्या प्रवाहात ज्या मार्गातून जनावरांचे मलमूत्र वाहून जाते तिथे जाळी लावण्यात आली होती, परंतु तबेला मालकांनी त्या जाळ्या तोडून टाकल्या. तूर्त महापालिकेने या आठवड्यात नदीतले शेण काढून टाकण्याची कबुली दिली आहे, अशी माहिती रिव्हर मार्चने दिली.महापालिका आर/मध्य विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर यासंदर्भात म्हणाले की, दहिसर नदीमध्ये शेणाचा थर हा गेल्या ४०-५० वर्षांपासून साचतोय. महापालिकेच्या वतीने दर मे महिन्याला शेणाचा थर उपसला जातो. पालिकेकडून तबेला मालकांवर कारवाई सुरू झालेली आहे. येथील तबेल्यांचे स्थलांतर करण्यात आले असून ते स्थलांतरित झाले नाहीत.

टॅग्स :नदी