दहिसरात भुरट्या चोरांमुळे नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:47 AM2018-11-02T00:47:49+5:302018-11-02T00:48:52+5:30
वृद्धावर जीवघेणा हल्ला; उद्यानातील लोखंडी ग्रीलची चोरी, वारंवार तोडफोड
मुंबई : दहिसरमधील एका सोसायटी उद्यानातून लोखंडी ग्रीलची चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी सतत तोडफोड करण्याबरोबरच भुरट्या चोरीचे प्रकारही सुरू आहेत़ याला विरोध करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला करण्यात आला आहे़ त्यामुळे स्थानिक हैराण झाले असून पोलिसांकडून परिसरात बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
काही दिवसांपूर्वीच्या हल्ल्यात किरण आडवणकर (वय ६८) हे जखमी झाले. दहिसर पूर्वच्या आनंदनगर परिसरात असलेल्या राष्ट्रीय मजदूर आनंद नगर को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत. गेल्या काही दिवसांपासून या सोसायटीत असलेल्या उद्यानाच्या लोखंडी ग्रील्सची चोरी केली जात आहे. या ग्रील्स आमदार निधीतून लावण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून उद्यानाची तोडफोडही सुरू आहे. बºयाचदा सोसायटीच्या खर्चातून याची डागडुजी करण्यात आली. चोरीचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. तोडफोड करणाºया काहींना स्थानिक महिलांनी पकडून जाब विचारला. तेव्हा सचिन चव्हाण आणि नितीन चव्हाण या व्यक्तींच्या सांगण्यातून त्यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले. त्यानुसार अडवणकर यांनी या प्रकरणी लेखी पत्र पोलीस उपायुक्त कार्यालयात दिले आहे. ‘माझ्यावर काही भुरट्या चोरट्यांनी हल्ला केला होता. मात्र त्याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी,’ अशी मागणी अडवणकर यांनी केली आहे.
कचऱ्याचे डबेही चोरीला
सोसायटीतील घरांमध्ये ग्रीलवर चढून घरात शिरणे, एकट्या महिलेला फोन करून धमक्या देणे याबरोबरच मोकळ्या जागेतील सामान, सायकली भुरट्या चोरट्यांकडून लंपास केल्या जात आहेत. इतकेच नव्हेतर, कचºयाचे डबेही पळविण्यात येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.