Join us

दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर या मार्गावर डिसेंबरपासून धावणार मेट्रो-२ ए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 1:04 AM

दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर या मेट्रो-२ ए या मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) वेगाने सुरू आहे.

मुंबई : दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर या मेट्रो-२ ए या मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) वेगाने सुरू आहे. दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर या १८.८ कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्गिकेच्या कामाची महानगर आयुक्त आर. ए. राजीव आणि इतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली. या संपूर्ण मार्गिकेवर या वर्षी डिसेंबर महिन्यामध्येच मेट्रो धावेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. या मेट्रो प्रकल्पाशी संबंधित कामे वेगाने होत असून वेळेवर काम पूर्ण करण्याकडे भर दिला जात असल्याचे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मेट्रो-२ ए या मार्गिकेवर दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर दरम्यान सतरा स्थानके उभारण्यात येणार आहेत. या सतरा मेट्रो स्थानकांपैकी बहुतांश मेट्रो स्थानकांना राजीव यांनी भेट देत पाहणी केली. आवश्यक कामगारांच्या संख्येमध्ये वाढ करून काम केले तर सप्टेंबर २०२०पर्यंत या मार्गिकेवर मेट्रोची चाचणी सुरू करण्यात येईल, असेही राजीव म्हणाले.मेट्रो- २ ए, मेट्रो-२ बी आणि मेट्रो-७ या मार्गावरील मेट्रो कोचसाठी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) यांना कंत्राट देण्यात आले आहे. मेक इन इंडियाअंतर्गत हे काम होणार आहे. ३८१६ कोटी रुपयांचे हे कंत्राट असून ५०४ मेट्रो कोचची निर्मिती होत आहे. याबाबतचा करार १९ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आला होता. काम पूर्ण करण्यास २१० आठवड्यांचा अवधी देण्यात आला होता.करारानुसार, ५०४ मेट्रो कोचची डिझाइन, निर्मिती, चाचणी, पुरवठा, जोडणी आदींबाबतची जबाबदारी बीईएमएल यांच्यावर असणारआहे. मॉक टेस्टसाठी मेट्रो कोच बीईएमएल यांनी उपलब्ध करूनदिला आहे. सहा कोचची पहिली प्रोटोटाइप मेट्रो जुलै २०२० पर्यंत उपलब्ध होणार आहे.