मुंबई-अंधेरी पश्चिम डी. एन.नगर - दहिसर या मेट्रो-२ ची सेवा अंदाजे नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मार्गावरील ट्रायल रनचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन केले होते. दहिसर येथील आनंद नगरच्या परिसरात असलेल्या मेट्रोच्या स्थानकाला अप्पर दहिसर नाव देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे या स्थानकाचे नाव बदलून आनंद नगर असे नाव देण्यात यावे यासंदर्भात स्थानिकांनी शिवसेनेचे स्थानिय नेते आणि म्हाडाचे सभापती डॉ.विनोद घोसाळकर यांना पत्र दिले आहे. दहिसरकरांच्या सदर मागणीचा लवकरच स्विकार करण्यात यावा या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटन- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मेट्रो प्रकल्प प्राधिकरण आयुक्त श्रीनिवासन यांनादेखील पत्र दिले आहे.
शिवसेनेचे स्थानीय विधानसभा संगठक कर्णा अमिन यांनी माहिती देताना सांगितले की, दहिसर क्षेत्र विस्तृत आहे, पण मेट्रो स्थानक पूर्णपणे आनंद नगरच्या सीमेत असून येथील मेट्रो स्थानकाला अप्पर दहिसर नाव देणे चुकीचे असून स्थानिकांना अमान्य आहे. गेले ५० वर्षा पूर्वी या परिसरात आनंद म्हात्रे हे स्थानिक शेतकरी भातशेतीच्या कामासाठी प्रसिद्ध होते. दहिसरतील हे क्षेत्र वर्ष १९७६ पासून महसूल विभागाच्या प्रॉपर्टी रजिस्टर कार्डावर (सीटी सर्वे) भूमापन पत्रक वरही आनंद नगर नावानेच ओळखले जात असून हा स्थानकाला नाव देण्यात यावे. या परिसरात सेक्टर १,२,३ मध्ये आलेल्या ३७ इमारत व आसपासच्या अनेक वसाहतीतील सोसायटी आनंद नगरच्या अंतर्गतच ओळखल्या जातात. पश्चिम रेल्वेचे दहिसर स्थानक येथून एक कि.मी. अंतरावर आहे. मुंबई महानगर पालिकेकडून येथील शाळाना आनंद नगर पब्लिक स्कूल असे नाव व पोलीस बीट चौकीनांही आनंद नगरच्या नाव दिलेले आहे .गेल्या ४५ वर्षापासून हा परिसरात दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव आनंद नगर उत्सव समितीच्या नावानेच मोठ्या स्वरूपात साजरे केले जात असून हा परिसर आनंद नगरच्या नावाने परिचित आहे, असल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्रशासनाने रिलायन्स मेट्रोच्या अंधेरी पूर्व भागातील आलेले स्थानकाला जुन्या वसाहती जे.बी.नगर (जमनालाल बजाज) या क्षेत्रांचे नाव न देता स्थानकाला चकाला नावाची ओळख दिली होती, असे सामाजिक कार्यकर्ते राजेश पंड्या यांनी सांगितले. स्थानीय रहिवाशांच्या विरोधामुळे प्रशासनाने स्थानकावर सुधारणा करून चकाला नाव सोबत जे. बी. नगर नाव नमूद केले आहे. हे लक्षात घेऊन सरकारनें स्थानकाचे अप्पर दहिसर नाव वगळावे किंवा सोबत आनंद नगर नाव जोडून लोकांच्या मागणीचा स्वीकार केला पाहिजे. जर सदर मागणी मान्य झाली नाही तर मोठ्या संख्येने दहिसरकर आंदोलन करतील असे कर्णा अमिन यांनी सांगितले.