मेट्रोच्या ‘अप्पर दहिसर’ नावाला दहिसरकरांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:06 AM2021-06-29T04:06:19+5:302021-06-29T04:06:19+5:30
आनंद नगर नामकरण करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - अंधेरी पश्चिम डी. एन. नगर-दहिसर या मेट्रो-२ची सेवा अंदाजे ...
आनंद नगर नामकरण करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - अंधेरी पश्चिम डी. एन. नगर-दहिसर या मेट्रो-२ची सेवा अंदाजे नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मार्गावरील ट्रायल रनचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन केले होते. दहिसर येथील आनंदनगरच्या परिसरात असलेल्या मेट्रोच्या स्थानकाला अप्पर दहिसर नाव देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे या स्थानकाचे नाव बदलून आनंद नगर असे करावे यासंदर्भात स्थानिकांनी शिवसेनेचे स्थानिक नेते आणि म्हाडाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांना पत्र दिले आहे. दहिसरकरांच्या या मागणीचा लवकरच स्वीकार करण्यात यावा यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटन-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मेट्रो प्रकल्प प्राधिकरण आयुक्त श्रीनिवासन यांना पत्र देण्यात आले आहे.
शिवसेनेचे स्थानिक विधानसभा संघटक कर्णा अमिन यांनी माहिती देताना सांगितले की, दहिसर क्षेत्र विस्तृत आहे, पण मेट्रो स्थानक पूर्णपणे आनंद नगरच्या सीमेत असून येथील मेट्रो स्थानकाला अप्पर दहिसर नाव देणे चुकीचे असून स्थानिकांना अमान्य आहे. गेले ५० वर्षांपूर्वी या परिसरात आनंद म्हात्रे हे स्थानिक शेतकरी भातशेतीच्या कामासाठी प्रसिद्ध होते. दहिसरातील हे क्षेत्र वर्ष १९७६ पासून महसूल विभागाच्या प्रॉपर्टी रजिस्टर कार्डावर (सीटी सर्वे) भूमापन पत्रकावरही आनंद नगर नावानेच ओळखले जात असून हेच नाव स्थानकाला देण्यात यावे. या परिसरात सेक्टर १,२,३ मध्ये आलेल्या ३७ इमारत व आसपासच्या अनेक वसाहतींतील सोसायटी आनंद नगरच्या अंतर्गतच ओळखल्या जातात. पश्चिम रेल्वेचे दहिसर स्थानक येथून एक कि.मी. अंतरावर आहे. मुंबई महानगरपालिकेकडून येथील शाळेला आनंद नगर पब्लिक स्कूल असे नाव व पोलीस बी. चौकींनाही आनंद नगर नाव दिलेले आहे. गेल्या ४५ वर्षांपासून या परिसरात दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव आनंद नगर उत्सव समितीच्या नावानेच मोठ्या स्वरूपात साजरे केले जात असून हा परिसर आनंद नगरच्या नावाने परिचित आहे.
सामाजिक कार्यकर्ते राजेश पंड्या यांनी सांगितले की, प्रशासनाने रिलायन्स मेट्रोच्या अंधेरी पूर्व भागातील स्थानकाला जुन्या वसाहती जे.बी.नगर (जमनालाल बजाज) या क्षेत्राचे नाव न देता चकाला नावाची ओळख दिली होती. स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे प्रशासनाने स्थानकावर सुधारणा करून चकाला नाव सोबत जे. बी. नगर नाव नमूद केले, हे लक्षात घेऊन सरकारने स्थानकाचे अप्पर दहिसर नाव वगळावे किंवा सोबत आनंद नगर नाव जोडून लोकांच्या मागणीचा स्वीकार केला पाहिजे. ही मागणी मान्य न झाल्यास मोठ्या संख्येने दहिसरकर आंदोलन करतील, असे त्यांनी सांगितले.
-------------------------------------------