दहिसरच्या तरुणावर प्राणघातक हल्ला, रस्त्यावर रंगला थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 04:07 AM2018-04-08T04:07:56+5:302018-04-08T04:07:56+5:30

फिरायला नेण्याच्या बहाण्याने मित्रांकडून महाविद्यालयीन तरुणावर प्राणघातक हल्ला चढविण्यात आला. रक्तबंबाळ अवस्थेत तो रस्त्यावरून पळत होता. त्याचे मित्र हातात लाकडी बांबू आणि वायर घेऊन त्याच्यामागे धावत होते.

 Dahisar's assault on the young man, a thunder in the streets | दहिसरच्या तरुणावर प्राणघातक हल्ला, रस्त्यावर रंगला थरार

दहिसरच्या तरुणावर प्राणघातक हल्ला, रस्त्यावर रंगला थरार

Next

मुंबई : फिरायला नेण्याच्या बहाण्याने मित्रांकडून महाविद्यालयीन तरुणावर प्राणघातक हल्ला चढविण्यात आला. रक्तबंबाळ अवस्थेत तो रस्त्यावरून पळत होता. त्याचे मित्र हातात लाकडी बांबू आणि वायर घेऊन त्याच्यामागे धावत होते. याच दरम्यान त्याने एका सोसायटीतील घरामध्ये स्वत:ला कोंडले. त्या घरातील एकाच्या मोबाइल क्रमांकावरून कुटुंबीयांना कळविले आणि स्वत:चा जीव वाचविला. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी चौकडीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दहिसर पूर्वेकडील परिसरात फरदीन खान (१७) कुटुंबीयांसोबत राहतो. तो बारावीचा विद्यार्थी असून, ठाकूर रामनारायण महाविद्यालयात शिक्षण घेतो. बुधवारी तो नेहमीप्रमाणे कॉलेजला आला. दुपारी अडीचच्या सुमारास लंच ब्रेकला तो कॉलेजच्या बाहेरील उपाहारगृहात बसला होता. त्याच दरम्यान, जुना मित्र रायन फर्नांडिस (१९) त्याला भेटला. त्याने स्कुटीवरून फिरून येऊ यात असे सांगितले. दोघेही दहिसर टोलनाक्यावरून पेणकरपाडा, मिरा रोड येथील हरेकृष्ण चौकातील चहाच्या टपरीजवळ आले. दुपारी ३च्या सुमारास तेथे आणखीन मित्र येणार असल्याचे सांगितले. रायनसोबत गप्पा मारत असतानाच, त्याचे दोन मित्र तेथे धडकले.
त्यामधील एका मुलाने, त्याला विचारले की, ‘तू ठाकूर कॉलेज में पढता है क्या?’ त्याने होकार देताच दोघांनी त्याला मारहाण सुरू केली. त्यानंतर, आणखीन तीन मित्र तेथे आले. त्यांनीही जवळील लाकडी बांबूने, वारयरने मारहाण सुरू केली. त्याच्या गळ्यातील चेन आणि मोबाइलही काढून घेतला. तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरून धावत होता आणि तरुणही त्याला मारण्यासाठी पाठलाग करत होते. एका घराचा दरवाजा उघडा दिसला. त्या घरात तो घुसला आणि कडी लावून घेतली. तेथील महिलेला त्याने झालेला प्रकार सांगितला. त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून त्यांनी नातेवाइकांना बोलावून घेतले.
नातेवाईक तेथे पोहोचताच त्याने सुरुवातीला काशिमीरा पोलीस ठाणे गाठले. मात्र, गुन्हा दहिसरच्या हद्दीत घडल्याने, त्याला दहिसर पोलीस ठाण्यास जाण्याचा सल्ला दिला. त्याने दहिसर पोलीस ठाणे गाठले. तेथून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून, ही मारहाण केल्याचा संशय पोलिसांना आहे.

घटनाक्रम असा...
फिरायला जाण्याच्या बहाण्याने मित्र त्याला मिरारोडला घेऊन गेला. तेथे आणखी काहीजण आले. त्यांनी जवळील लाकडी बांबूने, वारयरने मारहाण सुरू केली. त्याच्या गळ्यातील चैन आणि मोबाइलही काढून घेतला.
तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरून धावत होता आणि तरुणही त्याला मारण्यासाठी पाठलाग करत होते. एका घराचा दरवाजा उघडा दिसला. त्या घरात तो घुसला आणि कडी लावून घेतली.
तेथील महिलेला त्याने झालेला प्रकार सांगितला. त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून त्यांनी नातेवाइकांना बोलावून घेतले.

Web Title:  Dahisar's assault on the young man, a thunder in the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा