Join us

रोजच्या रोज फ्रोझन फूडचे सेवन; जीवावर बेतू शकते !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 10:01 AM

तात्पुरते पोट भरण्याचा आनंद, दीर्घकाळ आजारांच्या चक्रात.

मुंबई : शहरातील व्यस्त दिनक्रमात वेळ मिळत नसल्याने आता घराघरांत फ्रोझन फूडच्या पॅकेट्सने घुसखोरी केली आहे. अगदी चपाती, पराठ्यापासून ते थेट भाज्यांपर्यंतही सर्व काही मिनिटांत तयार झाले की, पोट लगेच भरते, असा काहीसा गैरसमज झाला आहे. मात्र तात्पुरते पोट भरण्याचा हा आनंद दीर्घकाळ आजारांच्या फेऱ्यात अडकवू शकतो. रोज फ्रोझन फूडचे सेवन केल्यास जीवावर बेतू शकते, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

फ्रोझन फूडमध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्चचा वापर केला जातो. ज्यामुळे या प्रकारचे खाद्यपदार्थ कितीही दिवस टिकू शकतात. शिवाय या पाकीटबंद पदार्थांमध्ये पामतेल, सोडियमचा वापरही अधिक असतो. त्यामुळे त्याचे शेल्फ लाईफ वाढते. शेल्फ लाईफ वाढविल्यामुळे हे पोषक घटकही कमी होतात.

अनेकदा फ्रोझन फूडच्या पॅकेटवर हे पदार्थ किती काळ टिकणार याविषयीची माहिती ग्राहकांना संभ्रमात टाकणारी असते. त्यामुळे अनेकदा ग्राहक ही माहिती न पडताळता थेट खरेदी करतात. या पॅकेटवर फ्रिजरमध्ये पदार्थ ठेवल्यास, फ्रिजमध्ये आणि पदार्थ उघड्यावर ठेवल्यास किती काळ टिकेल, हे स्पष्ट केलेले असते. याखेरीस या पदार्थाचा दैनंदिन आहारात समावेश करू नये. मात्र, कधीतरी खरेदी केल्यास त्यातील घटक, मुदत तपासून घ्यावेत -शैलेश आढाव, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

लहान मुलांना तळलेले पदार्थ अधिक आवडतात. त्यामुळे प्रत्येक घरात हल्ली या फ्रोझन फूडमधील तळणीच्या पदार्थांचे पॅकेट्स सहज दिसून येतात. मात्र, या पदार्थांत फॅट्स अधिक असल्याने स्थूलतेचा धोका असतो. लहान वयातच स्थूलतेची गंभीर समस्या निर्माण झाल्यास त्याचा परिणाम श्वसनप्रक्रियेवर होण्याचा धोका असतो. त्यामुळे लहानग्यांना हे पदार्थ देऊ नयेत, याखेरीस ताजे व सकस, पोषक आहार देण्यावर भर द्यावा. - निकिता दोषी, आहारतज्ज्ञ  

 फ्रोझन पदार्थांच्या सततच्या सेवनामुळे विविध आजार होऊ शकतात.  या पदार्थांमधील स्टार्चमुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते, तर या पदार्थांतील सोडियमच्या प्रमाणामुळे शरीरातील मिठाच्या प्रमाणातही चढउतार होण्याचा धोका असतो, यामुळे रक्तदाब होऊ शकतो. तसेच, हृदयविकाराचे निदानही होऊ शकते. याखेरीज, अधिक काळ टिकून राहण्यासाठी हे पदार्थ गोठविल्यामुळे यात कुठलेही पोषक घटक नसल्याने शरीराला योग्य पोषक आहारही मिळत नाहीत.

टॅग्स :जंक फूडहेल्थ टिप्स