Join us

मुंबईमधील रोजच्या कचऱ्याची समस्या मार्गी लागणार; बायोगॅस प्रकल्प राहणार उभा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 12:50 PM

ऊर्जा आणि रोजगार निर्मितीचा उद्देश असल्याचे प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील कचऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी हेल्पलाइन सुविधा दिल्यानंतर आता पालिकेने कचरा व्यवस्थापनसाठी, कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला आहे. पालिका प्रशासनाने मुंबईतील कचऱ्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडशी करार करून कॉम्प्रेस्ड बायोगॅस सयंत्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईतील हजारो टन कचऱ्याची समस्या मार्गी लागणार असून मुंबईकरांना पर्यावरणपूरक बायोगॅसही वापरासाठी उपलब्ध होणार आहे. ऊर्जा आणि रोजगार निर्मितीचा उद्देश असल्याचे प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आले. 

मुंबईत कचऱ्याची समस्या आणि त्यापासून होणारे प्रदूषण गंभीर असून स्वच्छ मुंबईसाठी पालिका उपाययोजना करत आहे. याचाच एक भाग म्हणून पालिका आणि महानगर गॅस कंपनी दरम्यान गुरुवारी बायोगॅस निर्मितीचा करार झाला.

सोसायट्यांना मिळणार मालमत्ता करात सवलत 

मुंबईत २०५० पर्यंत कार्बन न्यूट्रलसाठीचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट इतर शहरांच्या तुलनेत वीस वर्षे आधीचे ठेवले आहे, असे पालिका आयुक्त चहल यांनी सांगितले. तसेच, मुंबईत तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी आगामी कालावधीत आणखी भूखंड उपलब्ध करून देऊ, असेही ते म्हणाले. नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या गृहनिर्माण सहकारी संस्थांना मालमत्ता कराममध्ये ५  टक्के ते १० टक्के सवलतही देत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

असा आहे प्रकल्प

हॉटेल, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल येथील वाया गेलेले अन्न आणि मोठ्या भाजी मंडईतील वाया गेलेला भाजीपाला संकलित करणार आहे. त्यानंतर या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारा जैविक कचरा पालिकेकडून खास वाहनातून पुरविला जाणार आहे. कचऱ्याचे संकलन, पृथक्करण आणि वितरण अशी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला यांची उपस्थिती

यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यांच्यासह आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महानगर गॅसचे अध्यक्ष महेश अय्यर, व्यवस्थापक आशू सिंघल, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव उपस्थित होते. पालिकेच्या या प्रयत्नांना मुंबईकरांनीही जोड द्यायला हवी. कचऱ्याचे वर्गीकरण करायला हवे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नमूद केले. मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, राज्यात सौर, हरित ऊर्जा यावर जोर देत असून याच साखळीत हा बायोगॅसचा प्रकल्प सुरू होणार आहे.

तीन टप्प्यांत सुरू होणार प्रकल्पाचे काम

- बायोगॅस प्रकल्प प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत काम सुरू राहणार आहे. त्यात जैविक कचरा प्रक्रिया प्रकल्प, सेंद्रिय खत उत्पादन संयंत्र आणि हरित इंधन उत्पादन संयंत्र या टप्प्यांचा समावेश असेल. 

- या प्रकल्पाद्वारे उत्पादित केलेला जैविक वायू मुंबईच्या हद्दीत वापरला जाणार आहे. या प्रकल्पासाठी जैविक कचरा देण्याचे नियोजन सुरू केल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली.

अद्ययावत तंत्रज्ञानामुळे कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीची पर्यावरण पूरक अशी उपाययोजना उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चक्राकार अर्थव्यवस्था निर्माण होऊन पर्यावरणासाठी निश्चित मदत होईल.- श्रावण हर्डीकर, अतिरिक्त पालिका आयुक्त.

 

टॅग्स :मुंबई