Join us

मुंबईत पुन्हा दैनंदिन रुग्णांचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:07 AM

चिंता वाढतेय, मुंबईत पुन्हा दैनंदिन रुग्णांचा उच्चांकदिवसभरात ८ हजार ६४६ रुग्णांची नोंद, १८ बळीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई ...

चिंता वाढतेय, मुंबईत पुन्हा दैनंदिन रुग्णांचा उच्चांक

दिवसभरात ८ हजार ६४६ रुग्णांची नोंद, १८ बळी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कोरोनाचा कहर सुरू असून दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या नवा विक्रम रचत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह सामान्य मुंबईकरांच्या चिंतेतही भर पडली असून संसर्ग नियंत्रणाचे आव्हान कठीण होत चालले आहे. शहर, उपनगरात गुरुवारी ८ हजार ६४६ रुग्णांची नोंद झाली असून १८ बळी गेले आहेत. परिणामी कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख २३ हजार ३६० झाली असून मृतांचा आकडा ११ हजार ७०४ झाला आहे.

सध्या शहर, उपनगरात ५५ हजार ५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. बरे झालेल्या रुग्णांचा दर ८४ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४९ दिवसांवर आला आहे. २५ ते ३१ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३८ टक्के असल्याचे दिसून आले. मुंबईत दिवसभरात ४६ हजार ७५८ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ४१ लाख २९ हजार ९३१ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्स ८० असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६५० आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २७ हजार ११ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

* रुग्णसंख्येचा आलेख चढताच

१ एप्रिल ८ हजार ६४६

३१ मार्च ५ हजार ३९४

३० मार्च ४ हजार ७५८

२९ मार्च ५ हजार ८८८

२८ मार्च ६ हजार ९२३