दिवसभरात काेराेनाचे ९५३ रुग्ण, ४४ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या तीव्र लाटेनंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या हजारांच्या खाली गेल्याची नोंद झाली आहे. शहर, उपनगरांत मंगळवारी ९५३ रुग्ण आणि ४४ मृत्यूंची नोंद झाली; तर दिवसभरात २ हजार २५८ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ६ लाख ४१ हजार ५९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर पोहोचले असून रुग्ण दुपटीचा कालावधी २५५ दिवसांवर पोहोचला आहे.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६ लाख ९० हजार ८८९ झाली असून मृतांचा आकडा १४ हजार ३५२ झाला आहे. सध्या शहर, उपनगरांत ३२ हजार ९२५ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हळूहळू रुग्णसंख्येत घट
गेल्या वर्षभरात १ फेब्रुवारीला ३२८ म्हणजेच सर्वांत कमी रुग्ण आढळून आले. त्यात वाढ होत जाऊन १८ मार्चला २८७७, २१ मार्चला ३७७५, १६ मे राेजी १५४४, तर १७ मे राेजी १२४० नवे रुग्ण आढळून आले. यावरून रुग्णसंख्येत घट होत असल्याचे दिसते.
जी उत्तर विभागात २९११ सक्रिय रुग्ण
पालिकेच्या जी उत्तर विभागात म्हणजेच माहीम, धारावी आणि दादर विभागांत मागील काही दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्येत घट हाेत आहे. मंगळवारी दिवसभरात या विभागांत ५१ रुग्णांची नोंद झाली, तर एकूण रुग्णसंख्या २५,५२९ इतकी आहे. सध्या या विभागात दोन हजार ९११ रुग्ण उपचाराधीन आहेत; तर २१,९१७ रुग्ण काेराेनामुक्त झाले.
........................................