मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. शनिवारी १ हजार ७०८ रुग्ण आणि ५ मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ४१ हजार ९८५ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ५२४ झाला आहे. मुंबईत १३ हजार २४७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत दिवसभरात ९४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ३ लाख १६ हजार ३२० रुग्णांनी कोरोनावर मात केली. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९२ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत ३५ लाख ३७ हजार ६६४ चाचण्या झाल्या आहेत.
मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ३१ असून, सक्रिय सीलबंद इमारती २२० आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील १२ हजार ४ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.
सर्वाधिक मृत्यू ६० ते ६९ या वयाेगटातील
मुंबईत झालेल्या ११ हजार ५१९ रुग्णांच्या मृत्यूंपैकी ५० ते ५९ वयोगटांतील २ हजार ४९४, ६० ते ६९ वयाेगटातील ३ हजार ३०२, ७० ते ७९ वयाेगटातील २ हजार ७७२, ८० ते ८९ वयाेगटातील १ हजार २८४, तर ४० ते ४९ या वयाेगटातील १ हजार ५६ रुग्णांचा मृत्यू झाला.